धुळे लोकसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाकडे विजयी होणारे व पक्षाचे पाटतिडकीने काम करणारे उमेदवार असताना राज्यातील पक्ष नेतृत्वाने भाजपच्या उमेदवाराला फायदा पोहचवण्यासाठीच नाशकात अडगळीत पडलेल्या नेत्याची धुळे लोकसभा मतदार संघात उमेदवारी लादली असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी केला आहे. याच नाराजी नाट्यावरुन त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा दिला आहे. येथील काँग्रस कमिटी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ. राजेंद्र ठाकरे, महिला काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस मंगला तलवारे, युवकचे माजी तालुकाध्यक्ष संदीप निकम, नितीन बच्छाव, डॉ. अरुण पठाडे, संजय पाटील, दत्तू खैरनार, वाय. के. खैरनार, सतीश पगार, किरण निकम, युवकचे तालुकाध्यक्ष सुमित निकम आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
धुळे लोकसभा मतदार संघात डॉ. शेवाळे यांच्यासह धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सेनेर उमेदवारीसाठी इच्छुक होते. आम्हा दोघांपैकी कोणी ही उमेदवार राहिला असता तर तो या निवडणुकीत शंभर टक्के विजयी झाला असता. परंतू ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला अशा राज्यातील पक्ष नेतृत्वाने आमचा विश्वासघात करीत नाशिक शहरातील त्यांच्याच प्रभागात अडगळीत पडलेल्या नेत्याला उमेदवारी देऊन पक्षाचे निष्ठेने काम करणार्या नेत्यांवर अन्याय केला असल्याचे सांगून डॉ. शेवाळे म्हणाले, 2009 पासून मी स्वत: लोकसभेसाठी इच्छुक होतो. त्यानंतरही 2014 व 2019 च्या लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. त्यावेळी ही पक्षनेतृत्वाने दखल घेतली नाही. तरी देखील पक्षनिष्ठा ठेवत पक्ष वाढीसाठी काम केले असे सांगून डॉ. शेवाळे म्हणाले, असे असताना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा असताना व त्या दृष्टीकोनातून प्रयत्न करीत असताना पक्ष नेतृत्वाने धुळे व मालेगाव येथील उमेदवारांच्या नावाचा विचार न करता नाशिक स्थित उमेदवार लादला असल्याने मतदार संघात नाराजी पसरली आहे. याच नाराजीतून आपण पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मेलद्वारे दिला आहे. आज जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. या लादलेल्या उमेदवाराचे आपण निवडणुकीत काम करणार नसल्याचे स्पष्ट करीत डॉ. शेवाळे म्हणाले, पक्षनेतृत्वाने जर धुळे लोकसभा मतदार संघातील लादलेला उमेदवार बदलला नाही तर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे ही डॉ. शेवाळे यांनी स्पष्ट केले. दरम्यान धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांनी डॉ. शेवाळे यांची मालेगाव काँग्रेस कमिटी कार्यालयात भेट घेतल्याने राजकिय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.
धुळे लोकसभा मतदार संघातून माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदार संघातील वातावरण ढवळून निघाले आहे. डॉ. शेवाळे यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर महिला काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस मंगला तलवारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. डॉ. शेवाळे हेच आमचा पक्ष आहेत. त्यामुळे ते जो निर्णय घेतील तोच आमचा निणर्य राहिल, असे युवक काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष संदीप निकम यांनी सांगितले. तर इतर पदाधिकारी ही येत्या एक, दोन दिवसात सामुहिक राजीनामे देणार आहेत.
विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे हे निष्क्रीय खासदार आहेत. त्यांच्यावर त्यांच्याच पक्षातील अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज आहेत. काँग्रेस पक्षाची जर खरोखरच डॉ. भामरे यांना पराभूत करण्याची मनापासून इच्छा असेल तर सर्व पक्षीय नेत्यांनी एकच उमेदवार उभा करावा.
– अनिल गोटे, माजी आमदार धुळे
धुळे लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या उमेदवार माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांना भेटण्यासाठी मालेगावी तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आल्या असता त्यांना कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी डॉ. बच्छाव या कार्यालयाकडे येताच कार्यकर्त्यांनी परत जा परत जा अशी प्रचंड घोषणाबाजी केली. यावेळी डॉ. शेवाळे समर्थकांनी डॉ. बच्छाव यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. यावेळी डॉ. बच्छाव या डॉ. शेवाळे यांना न भेटताच परतावे लागले.