Dhule Lok Sabha | दोन दिवसात उमेदवार बदला, धुळ्यात काँग्रेस मधील गटबाजी उफाळली; नाराज गटाचे राजीनामा अस्र

Dhule Lok Sabha | दोन दिवसात उमेदवार बदला, धुळ्यात काँग्रेस मधील गटबाजी उफाळली; नाराज गटाचे राजीनामा अस्र

महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसने धुळे लोकसभेसाठी डॉक्टर शोभा बच्छाव यांची उमेदवारी जाहीर करताच धुळे जिल्ह्यात काँग्रेस मधील गटबाजी उफाळून बाहेर आली आहे. या नाराज गटाने राजीनामा अस्र उगारले असून दोन दिवसात उमेदवारी न बदलल्यास बंडाचा इशाराच दिला आहे. विशेषतः मतदार संघाबाहेरील उमेदवार दिल्याने पक्ष नेतृत्व नाना पटोले यांच्यावर देखील टीकास्त्र सोडण्यात आले आहे. काँग्रेसचे धुळे जिल्ह्याचे अध्यक्ष श्यामकांत सनेर यांच्यासह शिंदखेडा तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन हा रोष व्यक्त केला आहे. तसेच नाशिक जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनीही राजीनामा दिला आहे.

धुळे जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून महाविकास आघाडीच्या वतीने उमेदवाराची चाचपणी करणे सुरू होते. हा मतदारसंघ काँग्रेसला सोडलेला असल्यामुळे काँग्रेसच्या गोटात उमेदवाराचा शोध सुरू होता. दररोज नव्या इच्छुकाचे नाव पुढे येत होते. मात्र काँग्रेस कडून कोणताही उमेदवार जाहीर करण्यात येत नव्हता. सुरुवातीला काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर तसेच नाशिकचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार शेवाळे यांच्यासह अन्य दोघांनी उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार त्यांची नावे देखील पक्ष नेतृत्वाकडे पाठवण्यात आली होती. मात्र त्यावर निर्णय होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू होती. त्यातच भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा डॉक्टर सुभाष भामरे यांना संधी दिली. त्यामुळे भाजपकडून मेळाव्यांवर जोर देणे सुरू झाले. परिणामी काँग्रेसच्या गटांमध्ये अस्वस्थता पसरली. अखेर काल रात्री काँग्रेसने नाशिक येथील डॉक्टर शोभा बच्छाव यांना धुळे लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. मात्र ही उमेदवारी जाहीर होताच काँग्रेस मधील गटबाजी उफाळून आली आहे. पक्ष नेतृत्वाने मतदार संघाबाहेरील उमेदवाराला संधी देऊन एक प्रकारे भारतीय जनता पार्टीला पूरक वातावरणात तयार केला असल्याचा उघड आरोप कार्यकर्त्यांनी केला. या नाराज गटामधील धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी आपल्या पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे पाठवला आहे. या राजीनाम्यामध्ये देखील आपण उमेदवारीसाठी इच्छुक असताना संधी दिली गेली नाही. याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली आहे .तर शिंदखेडा तालुक्यातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील आपले राजीनामे सादर केले आहे.

या संदर्भात शामकांत सनेर यांच्या निवासस्थानी या नाराज गटाची बैठक झाली. यात उमेदवारी न बदलल्यास संविधानाच्या चौकटीत राहून बंड करण्याची इशारा देखील देण्यात आला. या बंडाला शामकांत सनेर यांनी दुजोरा दिला आहे. काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्ता असणाऱ्या धुळे जिल्ह्यातून मी आणि नाशिक जिल्हाध्यक्ष यांनी उमेदवारी मागितली. पण महिनाभर पक्ष नेतृत्वाकडून खेळ सुरू झाला. सक्षम चेहरा आणि पैसा नसल्याचे गणित मांडले गेले. सतत भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर संधान साधून काँग्रेस नेतृत्व संधान साधत राहिल्याचा आरोप सनेर यांनी केला. त्यामुळे आपले मन व्यथित झाले आहे. आमची निष्ठा 31 वर्षाचा संघर्ष वाया गेला. बाहेरच्या जिल्ह्यातून आयात करून उमेदवार लादला गेला. आधी बीजेपी बरोबर दोन हात करणारे लोक, वैचारिक प्रगल्भता तसेच पक्षासाठी लढणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले गेले. धुळे लोकसभा मतदारसंघातील निष्ठावान कार्यकर्त्यांचा आवाज दाबला गेला आहे. त्यामुळे उमेदवार बदलण्याची मागणी करण्यात आली. शाम सनेरांचा द्वेष असेल तर धुळे लोकसभा मतदारसंघातील कुणालाही उमेदवारी द्यावी, असे देखील यावेळी स्पष्ट करण्यात आले. हा निर्णय दोन दिवसात घ्यावा, असा अल्टिमेटम दिला गेला. आपला रोष पक्ष नेतृत्वावर आहे. त्यांना दोन दिवसाचा वेळ दिला गेला आहे .या नंतरच्या कालावधीमध्ये खेळ करणाऱ्यांचा विषय जनतेसमोर आणला जाईल. हा काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अस्मितेचा विषय आहे. निष्ठावानांना डावलण्याचे पाप कोणी केले. ही बाब आता लपून राहणार नाही. त्यांना मतदार धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही .प्रत्येक वेळेस स्टंटबाजी च्या नावाखाली निष्ठावनांना कमी लेखण्याचे काम गेल्या 30 वर्षापासून पाहतो आहे. संविधानाचे वाचवण्याचे काम गरिबांनी करायचे ,पण उमेदवारी मात्र श्रीमंतांना द्यायची, ही बाब देखील प्रकर्षाने सनेर यांनी मांडली. काँग्रेस ही चळवळ आहे. ही संस्कारातून वाढली. पण कारखानदार आणि धनाड्य लोक चळवळ संपवण्याचा निर्णय घेतील, तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याला एक पाऊल पुढे यावेच लागेल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news