धुळे : पुढारी वृत्तसेवा- आपल्या देशातील लोकशाही ही सर्वांत श्रेष्ठ असून लोकशाहीत सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे मतदान आहे. मतदानासारख्या लोकशाहीच्या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन आपला हक्क बजावावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले.
धुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वीप' उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये मतदार जनजागृती महारॅलीचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. यावेळी सोनगीर ता. धुळे येथील मतदान जनजागृती कार्यक्रमात नरवाडे बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, उपजिल्हाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी संजय बागडे, तहसिलदार अरुण शेवाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) गणेश मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) भाऊसाहेब अकलाडे, प्रकल्प संचालक बी.ए.बोटे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी सुरेखा देवरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे म्हणाले की, रक्तदान, नेत्रदानाबरोबरच लोकशाहीमध्ये नागरिक म्हणून सर्वात श्रेष्ठदान हे मतदानच आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने आपण सुट्टींचा आनंद घेतो. काही मतदार मतदान करण्यास टाळाटाळ करतात. लोकशाहीत मतदान हा आपला हक्क आहे परंतु आपण तो बजावत नाही. त्यामुळे या रॅलीतून जनजागृती करण्यात येत आहे. जेणेकरून जिल्ह्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल. आज देशात मतदानाची टक्केवारी 67 टक्के तर धुळे जिल्ह्याची 58 टक्के आहे. यापेक्षाही काही भागात ही आकडेवारी खूपच कमी आहे. यावर्षी त्यात वाढ होण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहेत.
ते पुढे बोलतांना म्हणाले की, आपण सुट्टीत मौजमजा करु शकतात पंरतू दर 5 वर्षातून एकदाच मतदान करून आपला लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी मिळते त्या संधीचा उपयोग करुन येत्या 20 मे 2024 ला जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोलतांना म्हणाले की, आज सोनगीर येथे प्रातिनिधीक स्वरुपात स्वीपअंतर्गत जनजागृती कार्यक्रम सर्व जिल्ह्याच्या कार्यालय प्रमुखांच्या उपस्थितीत होत आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये अशाच प्रकारचा कार्यक्रम होत आहेत. यात सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, बचतगटांचे प्रतिनधी, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित आहे. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहीत करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून पहिली ते 12 पर्यंतच्या 4 लाख विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरुन घेण्यात येणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये विद्याथी, ग्रामस्थ, अधिकारी यांचे ग्रुप तयार करुन त्या ग्रुपमार्फत स्थानिक भाषेत मतदान जनजागृतीपर संदेश पोहचविण्यात येत आहे. त्याचबरोबर सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेच्या कालावधीत प्रत्येक घरोघरी कर्मचाऱ्यांमार्फत व्होटर हेल्पलाईन ॲपचे रजिष्टेशन करुन घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उपशिक्षणाधिकारी संजय विभांडीक यांनी केले.
प्रारंभी सकाळी विद्यार्थ्यांची व मतदारांची जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीत शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, तरुण मतदार, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रांगोळी स्पर्धा, पथनाटयाद्वारे विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्व पटवून दिले. यावेळी मतदानाचा हक्क बजविण्यासाठी मतदार प्रतिज्ञा घेण्यात आली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमास गावातील मतदार, महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक, तरुण मतदार, सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळ, सर्व विभागांचे विस्तार अधिकारी, कर्मचारी, मुख्याध्यापक, शाळेतील सर्व शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, अशावर्कर, बचत गट, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा –