नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, पारा ३७.२ वर स्थिरावला | पुढारी

नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, पारा ३७.२ वर स्थिरावला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून शुक्रवारी (दि. ५) पारा ३७.२ अंशावर स्थिरावला. हवेत तीव्र ऊकाडा जाणवत असल्याने सामान्यांना घामाच्या धारा लागल्या आहेत.

मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यात उन्ह तापायला सुरवात झाली. पारा थेट ४० अंशापर्यंत जाऊन पोहचला. उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे. परिणामी वातावरणात झालेला बदल व उकाड्यात झालेल्या वाढीचा फटका जिल्हावासीयांना सहन करावा लागत आहे. सकाळी साडेदहा ते दुपारी ४ या कालावधीत उन्हाच्या झळा अधिक जाणवत आहेत. त्यामूळे या काळात प्रमुख रस्त्यां वरील वर्दळ मंदावते आहे. उन्हापासून बचावासाठी नागरिक एसी, पंखे, कुलरचा मदत घेत आहेत. तसेच दुपारच्या सुमारास कामानिमित्त घराबाहेर पडणे टाळले जात आहे. दुसरीकडे ऊन्हाचा तडाखा बघता शेतीची कामे सकाळी दहापूर्वी किंवा चार नंतर ऊरकून घेण्यावर बळीराजाचा कल आहे.

मध्यप्रदेशातील जबलपुर ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा वाऱ्याचा पट्टा तयार झाला आहे. तसेच अरबी समुद्र व बंगलाच्या उपसागरातून चक्रीय वारे विरुद्ध दिशेने वाहत असल्याने राज्यात शनिवारपासून (दि. ६) पुढचे ३ दिवस दमटयुक्त हवामान राहिल. तसेच विदर्भासह काही ठिकाणी अवकाळीच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

Back to top button