नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- सूर्याचे उत्तरायण सुरू झाल्यानंतर सूर्योदयाला सूर्याची किरणे श्री काळाराम मंदिरात अशा प्रकारे पडतात की, ते थेट गाभाऱ्यातील श्रीराम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्तीवर पडून त्यांना सूर्यस्नान घडते. सध्या या किरणोत्सवास सुरुवात झाली असून, तो बघण्यासाठी मंदिरात भाविकांची गर्दी होत आहे.
कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील किरणोत्सव प्रसिद्ध आहे. दरवर्षी हा किरणोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून अशाच प्रकारचा किरणोत्सव श्री काळाराम मंदिरात बघण्याचा नाशिककरांना योग येत आहे. श्री काळाराम मंदिराच्या पूर्व दरवाजासमोरच्या बाजूला वटवृक्ष होता. तो वटवृक्ष सहा वर्षांपूर्वी पावसाळ्यात कोसळला. त्यामुळे मंदिराच्या पूर्व दरवाजाच्या बाजूने थेट सूर्यकिरणे मंदिरात येत आहेत.
श्री काळाराम मंदिराची उभारणी सतराव्या शतकातील असून, त्यावेळी मंदिराच्या समोरच्या बाजूला कोणत्याही प्रकारची बांधकामे व मोठे वृक्ष नव्हते. त्यावेळी सूर्यकिरण मूर्तीवर पडत असत. सध्या उंच बांधकामअसल्यामुळे सूर्याचे पहिले किरण पोहोचण्यास सकाळचे 7 वाजतात. सध्या उत्तरायण सुरू असल्याने सूर्याची किरणे उत्तरेकडे सरकत जात आहेत. ही सूर्यकिरणे हळूहळू मूर्तीच्या चरणापर्यंत येतात. या वर्षी अजून आठ दिवस हा किरणोत्सव सुरू राहणार असल्याचे श्री काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी यांनी सांगितले.
हेही वाचा :