जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप! दोन बडे नेते कमळाची साथ सोडून मशाल हाती घेणार | पुढारी

जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप! दोन बडे नेते कमळाची साथ सोडून मशाल हाती घेणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा – जळगाव जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार आहे. भाजपाचे खासदार उन्मेश पाटील व करण पवार हे कमळाची साथ सोडून हाती मशाल घेणार आहेत. यास संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी होकार दिला असून उद्या (दि.3) रोजी दोघांचाही शिवसेनेच्या ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जळगाव लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचे तिकीट कापून स्मिता वाघ यांना तिकीट देण्यात आले आहे. भाजपमधील अंतर्गत संघर्षातून उन्मेष पाटील यांना डावलण्यात आल्याची चर्चा आहे. खुद्द उन्मेष पाटील यांनी आपल्याला पक्षाचा निर्णय मान्य असल्याचे जाहीर केले असले तरी ते जाहीर उमेदवाराच्या प्रचारात सहभागी झालेले नाहीत. यात करण पवार यांचीही एंट्री झाली. त्यांनी शिवसेना-उबाठाच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट देखील घेतली.

दरम्यान, कालपासून राजकीय घडामोडी गतीमान झाल्या असून उन्मेष पाटील व करण पवार हे आपल्या समर्थकांसह मुंबईत डेरा टाकून बसलेले आहेत. दरम्यान उन्मेष पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या भेटही घेतल्याची माहिती आहे. उद्या त्यांचा शिवसेना-उबाठा पक्षात प्रवेश होणार आहे. यानंतर जळगावसाठी करण पवार हे उमेदवार असणार आहे. याबाबत जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. गेल्या दहा-बारा दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दि.3 रोजी विद्यमान खासदार उन्मेश पाटील व त्यांचे जिवलग मित्र करण पवार यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. करण पवार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जळगाव लोकसभेचे उमेदवार आहेत.

Back to top button