Dhule Lok Sabha 2024 | ‘वंचित’कडून धुळ्यात माजी आयपीएस अधिकारी अब्दुर्र रहमान यांना उमेदवारी, भाजपसमोर आव्हान | पुढारी

Dhule Lok Sabha 2024 | 'वंचित'कडून धुळ्यात माजी आयपीएस अधिकारी अब्दुर्र रहमान यांना उमेदवारी, भाजपसमोर आव्हान

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने माजी आयपीएस अधिकारी अब्दुर्र रहेमान यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे तुर्त प्राथमिक स्थितीत भारतीय जनता पार्टी समोर वंचितने आव्हान उभे केल्याचे चित्र आहे. मात्र अजूनही काँग्रेसच्या गटातून चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून दररोज नवीन इच्छुकांची केवळ नावेच पुढे येत आहेत. त्यामुळे धुळे लोकसभेच्या लढतीचे चित्र अद्यापही अस्पष्ट आहे. (Dhule Lok Sabha 2024)

धुळे लोकसभेमध्ये धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, सटाणा अशा सहा विधानसभा क्षेत्राचा समावेश आहे. या लोकसभेत गेल्या वीस वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व आहे. गेल्या सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत धुळ्याचे डॉक्टर सुभाष भामरे यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर विजय मिळवून लोकसभेत धडक मारली आहे. आता पक्षाने पुन्हा तिसऱ्या वेळेस त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही उमेदवारी जाहीर होऊन दोन आठवडे उलटले असून विरोधी गटाकडून अद्यापही उमेदवार दिला नसल्याने मतदारांमध्ये देखील गोंधळाची स्थिती होती. अखेर काल रात्री वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी धुळ्याची उमेदवारी माजी आयपीएस अधिकारी अब्दुर्र रहमान यांना जाहीर केली आहे. पोलीस अधिकारी अब्दुर्र रहमान यांनी धुळ्याच्या पोलिस अधीक्षक पदावरून काम केलेले आहे. त्यामुळे त्यांचा धुळे जिल्ह्याची संपर्क आहे. तसेच गेल्या काही महिन्यांपासून ते लोक संपर्क करीत होते. त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस कडून देखील उमेदवारीची इच्छा व्यक्त केली होती. राष्ट्रीय काँग्रेसमध्ये अद्यापही चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असल्याचे पाहून त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडे इच्छा व्यक्त केली. त्यानुसार त्यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

तसेच धुळे लोकसभा काँग्रेसकडे सोडण्यात आली आहे. मात्र काँग्रेसमध्ये अद्यापही निवडणूक लढण्यासाठी कोणीही इच्छुक नसल्याने केवळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू आहे. यापूर्वी आमदार कुणाल पाटील यांनी 2019 मध्ये काँग्रेसच्या वतीने लढत दिली होती. मात्र त्यांचा पराभव झाला होता. आता मात्र त्यांनी उमेदवारी करण्यास नकार दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मालेगावचे डॉक्टर तुषार शेवाळे तसेच काँग्रेसचे धुळे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर हे देखील निवडणुकीसाठी इच्छुक होते .मात्र त्यांच्या नावासंदर्भात देखील अद्याप निर्णय झालेला नाही. आता धुळ्याच्या माजी पालकमंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांचे देखील नाव चर्चेत आले असून आणखी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याचा देखील निवडणुकीच्या रिंगणात समावेश होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जाते आहे. तुर्त धुळ्यात भारतीय जनता पार्टी समोर वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी देऊन रणशिंग फुंकले आहे.

हेही वाचा :

Back to top button