Hemant Godse | ‘एक हजार एक टक्के दुसऱ्या यादीत नाव येईल, मुख्यमंत्री भेटीनंतर गोडसेंचा दावा कायम

Hemant Godse | ‘एक हजार एक टक्के दुसऱ्या यादीत नाव येईल, मुख्यमंत्री भेटीनंतर गोडसेंचा दावा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या नावाच्या चर्चेने जोर धरला असताना गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून असलेल्या हेमंत गोडसे यांनी शुक्रवारी (दि.२९) पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर नाशिकमधून उमेदवारीसाठी आपलेच नाव जाहीर होईल, असा दावा करत दुसऱ्या यादीत नाव येईल, असा विश्वास गोडसे यांनी व्यक्त केला आहे.

उमेदवारीसाठी तीन दिवसांपासून खा. गोडसे शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत मुंबईत तळ ठोकून आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर करून देखील गोडसेंचे नाव शिवसेनेच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत आले नाही. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. तसेच नाशिकमधून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री भुजबळ यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर गोडसे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर 'एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी मिळेल', असा विश्वास त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आहे. गोडसे म्हणाले की, आपण काम करत राहा. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. लवकरच नाशिक लोकसभेची अधिकृत घोषणा होईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहे.

आमचे मुख्यमंत्री आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत…

पहिल्या यादीत तुमचे नाव नाही, यावर विचारले असता गोडसे म्हणाले, शिवसेनेला १८ जागा मिळाव्यात, अशी आम्ही मागणी केली होती. हा निर्णय महायुतीच्या वरिष्ठ स्तरावर होणार आहे. त्यामुळे दुसऱ्या यादीत माझे नाव नक्की जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

गोडसे म्हणाले की, मला १०० टक्के विश्वास आहे की, आमच्यावर अन्याय होणार नाही, आमचे मुख्यमंत्री आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाहीत. महायुतीचा धर्म पाळला जाईल का? अशी विचारणा केली असता ते म्हणाले की, १०० टक्के महायुतीचा धर्म पाळला जाईल. आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे. अधिकृत घोषणा लवकरच होईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news