हेमंत गोडसे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांसमोर शक्तिप्रदर्शन, नाशिकसाठी भुजबळांच्या नावाच्या चर्चेने शिंदे गट आक्रमक | पुढारी

हेमंत गोडसे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांसमोर शक्तिप्रदर्शन, नाशिकसाठी भुजबळांच्या नावाच्या चर्चेने शिंदे गट आक्रमक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिक लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याच्या चर्चेने उमेदवारी धोक्यात आलेले शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी बुधवारी(दि.२७) रात्री पुन्हा एकदा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमवेत मुंबई गाठत पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानासमोर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

नाशिकच्या जागेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिंदे गटाचे युवा नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुपूत्र खा. श्रीकांत शिंदे यांनी गोडसे यांची उमेदवारी एकतर्फी जाहीर केल्यानंतर भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने गोडसे यांच्या नावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे गोडसे यांनी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह रविवारी मुंबई गाठत उमेदवारीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर शक्तिप्रदर्शन केले होते. उमेदवारीसंदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर राष्ट्रवादीने नाशिकवरील दावा अधिक आक्रमक केला. विशेषत: उमेदवारीसाठी भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत संघर्ष उभा राहिला आहे. नाशिकच्या उमेदवारीबाबत बुधवारी पुण्यात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीनंतर नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार या चर्चेने जोर धरला. त्यामुळे उमेदवारी धोक्यात आल्याने अस्वस्थ झालेल्या गोडसे यांच्या उपस्थितीत मायको सर्कल येथील शिंदे गटाच्या कार्यालयात बैठक झाली. यानंतर गोडसेंसह शिंदे गटाचे पदाधिकारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

गोडसेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी

नाशिक लोकसभा मतदारसंघातून गोडसे यांनाच उमेदवारी मिळावी, यासाठी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी जोरदार घोषणाबाजी केली. नाशिक लोकसभा मतदार संघावर गेल्या दोन्ही वेळेला रेकोर्ड मतांनी शिवसेनेचे हेमंत गोडसे निवडून आले असून नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा होता आणि भविष्यातही शिवसेनेचाच राहील असे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button