Lok Sabha Election 2024 : विरोधाचा सूर हा नेत्यांचा की कार्यकर्त्यांचा? | पुढारी

Lok Sabha Election 2024 : विरोधाचा सूर हा नेत्यांचा की कार्यकर्त्यांचा?

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- लोकसभा निवडणूकीच्या तयारीसाठी सर्वच पक्ष जोमात कामाला लागले आहेत. पक्षांकडून उमेदवारांच्या नावाच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. त्यात भाजपाने नावे जाहीर करण्यात आघाडी घेतलेली आहे. आघाडी किंवा युती मधील अजून बरीच नावे बाकी आहेत. असे असताना जळगाव जिल्ह्यात महिलांना भाजपाने संधी दिलेली आहे. यात रक्षा खडसेंना पुन्हा संधी मिळालेली आहे. भाजपाने तिकीट जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील जळगाव व रावेर अशा दोन्ही जागांवर विरोध दिसू लागलेला आहे. हा विरोध नावे जाहीर करण्यापूर्वी का दिसला नाही हा प्रश्न कोणीच उपस्थित करीत नाही. मात्र, दोन्ही उमेदवारांना विरोध जो होतोय तो खरच कार्यकर्त्यांची नाराजी आहे का की नेत्यांची नाराजी आहे हा प्रश्न आहे. जिल्ह्याचे नेते मात्र सर्व अलबेल असल्याचे म्हणत बैठकांना उपस्थित राहत आहेत. ज्या बैठका होत आहे त्यामध्ये नाराजीचा सूर मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहे. गेल्या वेळेस महाजनांनी  जो करिष्मा करून दाखवलेला होता. स्मिता वाघ यांच्या जागी उन्मेश पाटील यांना उभे केले होते. तसेच यावेळेलाही होईल का अशी चर्चा सध्या मतदारसंघात आहे.

महिला सशक्तिकरण, बेटी बचाव बेटी पढाव या घोषणा देणाऱ्या भाजपाने महिलांना लोकसभेमध्ये नेण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांवर शंभर टक्के महिला आरक्षण दिलेले आहेत. या दोन्ही जागांवर महिलांना संधी दिल्याने  महिलांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे संकेत दिल्लीतून भाजपने दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभेचा विचार केला असता या वेळेस एकनाथ खडसे यांनी पक्ष बदलल्यामुळे रक्षा खडसे यांचे तिकीट कापले जाणार याची शक्यता 100 टक्के होती मात्र अचानक भाजपाने युटन घेत रक्षा खडसे यांनाच उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जिल्हाध्यक्षांच्या गाव भालोद गावामध्ये राजीनामाचे सत्र सुरू झाले. त्यानंतर वरणगाव बोदवड मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी पण नाराजी व्यक्त केली. तर वरणगाव येथे सुनील काळे यांनी रक्षा खडसेंच्याविरुद्ध आवाज उठविला. तिथेही अनेकांनी राजीनामे दिले.

दुसरीकडे जळगाव लोकसभेच्या विद्यमान उमेदवार स्मिता वाघ यांचे नाव जाहीर होताच जळगाव तालुक्यातील नागरिकांनी उन्मेश पाटील यांना पुन्हा तिकीट देण्यासाठी मागणी धरली व जळगाव लोकसभेतील इतर तालुक्यांमध्ये उन्मेश पाटील समर्थकांनी आपला राग व्यक्त केला. यावेळी राज्याचे संकट मोचक असलेले नामदार गिरीश महाजन यांनी पुन्हा कार्यकर्त्यांची चर्चा केली व कामाला लागण्याच्या सूचना केल्या. या दोन्ही लोकसभेमध्ये कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर भाजपच्या शिस्तीप्रमाणे एकही कारवाई झालेली दिसून येत नाही. निवडणुकीची वेळ आहे. त्यामुळे फक्त भाजपासाठी नरेंद्र मोदींच्या चारशे प्लस साठी कामाला लागा एवढेच सांगण्यात आले मात्र यामागे कोण सूत्रधार आहे हा विरोध अचानक का होत आहे. खडसे भाजपात असताना का रक्षा खडसेंना विरोध होत नव्हता ? मग आता तितका विरोध का होतोय ? हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.

जळगाव लोकसभेपेक्षाही रावेर लोकसभेकडे सर्वांचे लक्ष आहे. जेव्हा की संपूर्ण जळगावला माहिती आहे की एकनाथ खडसे व गिरीश महाजन यांच्यामध्ये 36 चा आकडा आहे. एकमेकांवर टीका केल्याशिवाय दोन्ही नेते शांत बसत नाही. मात्र निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्यापासून दोन हात लांब राहिलेले दिसत आहे.

पक्षातील कार्यकर्ते खरच नाराज आहे का? की वेगळी अजून काही खेळी बाकी आहे. कारण अजूनही एबी फॉर्म कोणाला मिळालेला नाही.  नावाच्या घोषणा जरूर झालेल्या आहेत मात्र ऐन वेळेस जळगाव जिल्ह्यात महिलांना प्राधान्य दिलेल्या भाजपाने पुन्हा महिलांच्या जागी दुसरे उमेदवार दिल्यास आश्चर्य वाटणार नाही. कारण गेल्या वेळेस भाजपाने जळगाव लोकसभेसाठी ही खेळी खेळलेली होती.

Back to top button