नाशिकच्या जागेवरून राज्याचे राजकारण तापले, इच्छुकांची वारी शिंदे- फडणवीसांच्या दारी | पुढारी

नाशिकच्या जागेवरून राज्याचे राजकारण तापले, इच्छुकांची वारी शिंदे- फडणवीसांच्या दारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिकच्या जागेवरून राज्याचे राजकारण तापले आहे. खा. हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीसाठी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानसमोर ठिय्या आंदोलन केल्यानंतर नाशिकच्या तिघा आमदारांसह भाजपकडून इच्छूक असलेले दिनकर पाटील, केदा आहेर, डॉ. राहुल आहेर आदींनी सोमवारी(दि.२५) सायंकाळी उशिरा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिकची जागा भाजपलाच सुटावी, यासाठी आग्रह धरल्याचे वृत्त आहे.

नाशिकच्या जागेवरून महायुतीत घमासान सुरू आहे. नाशिकवर शिंदे गटाचाच मूळ दावा असल्याचे ठासून सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची एकतर्फी उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजपने आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर नाशिकची जागा भाजपलाच सुटावी यासाठी भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. भाजपमधील सर्वच उमेदवार एकत्र आले असून उमेदवारी आमच्यापैकी कुणालाही मिळाली तरी चालेल पण नाशिकची जागा भाजपच्याच वाट्याला यावी, अशी आग्रही भूमिका घेतली जात आहे. महायुतीतील अन्य घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने देखील नाशिकवर दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी या जागेसाठी आग्रह धरला आहे. त्यातच महायुतीत झालेली मनसेची एन्ट्री भाजपसह शिंदे गट व अजित पवार गटासाठी डोकेदुखी ठरली आहे. मनसेने नाशिकच्या जागेची मागणी केल्यानंतर भाजप, शिंदे गट व राष्ट्रवादी गटाने या जागेसाठी आपला दावा अधिक प्रबळ केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री दादा भुसे, सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हेमंत गोडसे यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानसमोर ठिय्या आंदोलन केले. महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करून उमेदवारीच्या वादावर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

हेमंत गोडसे यांच्या शक्तीप्रदर्शनानंतर भाजपचे स्थानिक पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत. दुसऱ्याच दिवशी सोमवारी(दि.२५) सायंकाळी उशिरा आमदार प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. अॅड. राहुल ढिकले, दिनकर पाटील, केदा आहेर, अॅड. राहुल आहेर आदींनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत नाशिकची उमेदवारी भाजपलाच मिळावी, यासाठी आग्रह धरला. शिंदे गटाकडून गोडसे यांना उमेदवारी मिळाल्यास निवडून येण्याची शक्यता धूसर असल्यामुळे भाजपनेच ही जागा लढावी. नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बघण्याचे सर्वसामान्यांचे स्वप्न आहे. भाजपने अब की बार ४०० पार चा नारा दिला आहे. त्यासाठी नाशिकसारखी जागा भाजपनेच जिंकायला हवी, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांच्याकडे केल्याचे सांगण्यात आले.

महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा निर्णय आज

महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, उध्दव ठाकरे तसेच काँग्रेसच्या नेत्यांसमवेत उमेदवारी यादी निश्चितीबाबत सोमवारी बैठक झाली असून उमेदवारी यादी मंगळवारी(दि.२६) जाहीर केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडीच्या या यादीत नाशिकची उमेदवारी कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नाशिकमधून ठाकरे गटाने विजय करंजकर यांची उमेदवारी आधीच जाहीर केली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने देखील या जागेवर हक्क सांगितला आहे. करंजकर यांची उमेदवारी बदलावी, अथवा राष्ट्रवादीला ही जागा सोडावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी केल्याचे सांगितले जात आहे.त्यामुळे नाशिकच्या उमेदवारीबाबत काय निर्णय घेतला जातो, हे बघणे आता महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

हेही वाचा –

Back to top button