नाशिक जागेचा वाद अमित शाह यांच्या कोर्टात | पुढारी

नाशिक जागेचा वाद अमित शाह यांच्या कोर्टात

नाशिक पुढारी वृत्तसेवा- नाशिकसह रामटेक, ठाणे, रत्नागिरी, मुंबई या पाच जागांवरून महायुतीत निर्माण झालेला वाद आता भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोर्टात पोहोचला आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसमवेत अमित शाह बैठक घेणार असून, शनिवारी (दि.२३) होणाऱ्या या बैठकीत या जागांवर तोडगा निघणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा आता दिल्ली दरबारी पोहोचला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महायुतीच्या तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली आहे. महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांसोबत बैठक घेऊन अमित शाह जागावाटपाचा हा तिढा सोडविणार असल्याचे सांगितले जात आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीआधी अमित शाह यांच्या उपस्थितीत महायुतीची ही बैठक होणार आहे. नाशिकसह रामटेक, ठाणे, रत्नागिरी, मुंबईतील जागेबाबत महायुतीत वाद आहे. या जागांविषयीची माहिती स्वतः अमित शाह यांनी घेतली आहे. नाशिकच्या जागेबाबत बोलायचे झाल्यास या जागेवर शिवसेनेच्या शिंदे गटाचा मूळ दावा आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यानंतर भाजपनेही या जागेवर हक्क सांगितला आहे. मात्र शिंदे गटाचे युवानेते श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून विदयमान खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची एकतर्फी घोषणा केल्यानंतर भाजपत नाराजीचा सूर उमटला आहे. श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्याचा हक्कच नसल्याचा दावा करत भाजप नेत्यांनी गोडसे यांची उमेदवारी नाकारली आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानेही या जागेवर हक्क सांगत गोडसे यांची उमेदवारीची घोषणा मान्य नसल्याचे सांगितले आहे. या वादात आता मनसेनेदेखील उडी घेतली आहे. महायुतीत समावेश करत मनसेचे राज्यातील शिर्डी, दक्षिण मुंबई, व नाशिक या तीन जागांची मागणी केली आहे. यापैकी किमान दोन जागा तरी मिळाव्यात, अशी मनसेची भूमिका आहे. मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तर नाशिकमधून राज ठाकरे यांनी स्वतः निवडणूक लागवावी, अशी मागणी मनसे कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यामुळे नाशिकची जागा कोणाला मिळणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जागावाटपाचा वाद आता अमित शाह यांच्या दरबारी पोहोचल्याने ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Back to top button