Anil Gote : विकासाला विरोध करणाऱ्यांना धुळेकर जागा दाखवतील – माजी आमदार अनिल गोटे यांची टीका | पुढारी

Anil Gote : विकासाला विरोध करणाऱ्यांना धुळेकर जागा दाखवतील - माजी आमदार अनिल गोटे यांची टीका

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरात गेल्या पन्नास वर्षात एकाही नवीन रस्त्याची निर्मिती झाली नाही. केवळ आहे त्या रस्त्यावर डांबर टाकुन पैसा कमावण्याचे धंदे केले गेले. आपण पांझरा नदीच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी साडेपाच किलोमीटरचा रस्ता तयार केला. त्याचप्रमाणे आता हत्ती डोह ते पारोळा रोड जोडणारा नवीन रस्ता तयार करण्याचे काम सुरू केले. पण केंद्राने मंजूर केलेल्या रस्त्याला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट धुळ्यातील विकास कामाला विरोध करतो आहे. पण धुळेकर जनता योग्य वेळ आल्यानंतर त्यांना फटके दिल्याशिवाय राहणार नाही, असे आव्हान माजी आमदार अनिल गोटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिले.

धुळे येथील कल्याण भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत प्रसंगी लोकसंग्रामचे तेजस गोटे, दिलीप साळुंखे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना माजी आमदार अनिल गोटे यांनी विकासाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तीवर कठोर शब्दात टीका केली आहे. शहरातील पांझरा नदी हत्ती डोह ते पारोळा रोडवरील शेतकरी पुतळया पर्यंत जाणारा नवीन डी पी रस्ता तयार करण्याचे काम रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाने ओसाड गावचा जहागिदाराला पुढे करुन अडथळा करण्याचे उदयोग चालवले असल्याचा आरोप माजी आ. अनिल गोटे यांनी केला.
ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतून रस्ता जातो, त्यांचे ना हरकत पत्र दिनांक ७ सप्टेंबर २०२० रोजीच आंम्हाला तत्कालीन आयुक्तांनी दिले आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रश्नावर दोन वेळा स्वतःच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली. अखेरीस मान्यता दिली. धुळे जिल्हा बांधकाम विभागाने डी. पी. प्लॅन प्रमाणे रस्त्याचे इस्टीमेट तयार केले. अधीक्षक अभियंतांनी नाशिक येथे मुख्य अभियंत्यांकडून सचिव बांधकाम यांनी शिफारस करून केंद्र सरकारच्या रस्ते बांधकाम विभागाकडे पाठविले. तेथे सर्व कागदपत्रांची छाननी, तपासणी झाली. नंतर निधी मिळाला. असे असतांना विकास कामात अडथळा आणण्यात येत आहे. तसेच अजित पवारांसह राष्ट्रवादीची वाट लावण्याची सुपारी घेवूनच पुण्याचे तथाकथित कामाला लागले आहेत. धुळे शहराच्या विकासाची काहीही देणे घेणे नसलेल्या या तथाकथित पुढाऱ्याने आता जनतेच्या फायद्यासाठी तयार होणाऱ्या नवीन रस्त्याला विरोध करण्याचा उद्योग सुरू केला आहे. पण कोणत्याही विरोधाला आपण भीक घालत नसून धुळेकर जनतेला सुविधा देण्याचे काम आपण पूर्णत्वास नेणार असल्याचे देखील गोटे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा –

Back to top button