Dhule News : आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे निर्देश  | पुढारी

Dhule News : आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचे निर्देश 

धुळे : पुढारी वृत्तसेवा- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता आजपासून लागू केली आहे. धुळे लोकसभा मतदार संघासाठी 20 मे रोजी मतदान, तर 4 जून रोजी मतमोजणी होईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक नोडल अधिकारी तसेच विभाग प्रमुखांनी सतर्क राहून आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करीत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात लोकसभा निवडणुकीसाठी नेमलेले सर्व नोडल अधिकारी व विभागप्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महापालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आदर्श आचारसंहितेचे गांभीर्य प्रत्येकाने समजून घ्यावे. सर्व विभागांनी 24 तासात शासकीय इमारतीवरील आपापल्या कार्यक्षेत्रातील राजकीय पक्षांचे बॅनर, होर्डिंग्ज, फलक, पोस्टर तत्काळ काढून त्यांचा अहवाल सादर करावा. कोणत्याही नवीन कामांची प्रशासकीय मान्यता तसेच कार्यारंभ आदेश, प्रशासकीय मान्यता देण्यात येवू नये. तसेच कोणत्याही शासकीय अधिकारी कर्मचा-यांनी राजकीय व्यक्तींसोबत बैठका घेवू नये. तसेच कोणत्याही रॅलीत सहभागी होवू नये. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची शासकीय वाहने तातडीने जमा करावीत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्व एसटी बसेसवर लावण्यात आलेला जाहिरात मजकूर तातडीने काढण्यात यावा. नोडल अधिकाऱ्यांनी आदर्श आचारसंहिता पुस्तिकेचा सखोल अभ्यास करावा. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील माहिती जाणून घ्यावी. आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ गुन्हे दाखल करावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास तक्रार करण्यासाठी नागरिकांनी सी-व्हिजल या मोबाईल ॲपचा वापर करावा. नागरिकांना एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे या ॲपमध्ये छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येईल. या तक्रारींवर आचारसंहिता कक्षामार्फत त्वरीत कार्यवाही करावी असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे म्हणाले की, आदर्श आचारसंहितेचे पालन करीत असताना कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संबंधित यंत्रणेला कळवावे.

निवासी उपजिल्हाधिकारी गावंडे यांनी सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत शासकीय वाहने, कर्मचारी किंवा यंत्रणेचा निवडणूक प्रचार विषयक कामासाठी वापर होणार नाही याची सर्व विभागप्रमुख यांनी दक्षता घ्यावी. असे त्यांनी सांगितले. या बैठकीस जिल्ह्यातील सर्व नोडल अधिकारी, विभाग प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button