धुळे लोकसभा मतदारसंघातील भावी खासदारांचे स्वप्न भंगले, सुभाष भामरेंना तिसऱ्यांदा उमेदवारी | पुढारी

धुळे लोकसभा मतदारसंघातील भावी खासदारांचे स्वप्न भंगले, सुभाष भामरेंना तिसऱ्यांदा उमेदवारी

मालेगाव : नीलेश शिंपी

भाजपने राज्यातील लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. त्यात धुळे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांची निराशा झाली आहे. त्यांना आता खासदार होण्यासाठी पाच वर्षे थांबावे लागणार असल्याने त्यांचा पुरता हिरमोड झाला आहे.

देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वच पक्षात उमेदवारीसाठी अनेक जण इच्छुक आहेत. तसेच धुळे लोकसभा मतदारसंघातदेखील भाजपकडे लढण्यासाठी इच्छुकांची यादी मोठी होती. तर शिवसेनेतही युवासेना विस्तारक आविष्कार भुसे मतदारसंघात इच्छुक होते. त्या दृष्टीने खासदारकीसाठी इच्छुक असणार्‍यांनी मतदारसंघात संपर्कही वाढवला होता. डॉ. भामरे हे ज्या-ज्या वेळी मालेगावी आले, त्या-त्या वेळी आपल्याच उमेदवारी मिळेल, असे ठामपणे सांगत होते. तर दुसरीकडे आरएसएसचे प्रदीप बच्छाव यांना उमेदवारी द्यावी म्हणून समर्थकांनी बैठक घेत उमेदवारीवर दावा केला होता. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष दादा जाधव यांनी तर व्हॉट्सअॅपवर आत्तापर्यंत भाजपत असताना काय कामे केली याचा ऊहापोह केला होता. सेवानिवृत्त पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी ही कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांच्या गाठीभेटी घेत आपणही भाजपकडून लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असल्याचे स्पष्ट केले होते.

शिवसेनेचे आविष्कार भुसे यांनी गेल्या तीन-चार वर्षांपासून धुळे मतदारसंघात संपर्क वाढवत विविध कार्यक्रमांना हजेरीही लावत असतात. मतदारसंघातील युवकांसह सर्वसामान्य जनतेला ते सहज उपलब्ध होत असल्यामुळे युवकांनी भुसे यांच्यासाठी मतदारसंघ सोडावा, अशी मागणी करीत उमेदवारीसाठी प्रयत्न चालविले होते. त्यातच भाजप, शिवसेनेत काही जागांची अदलीबदली होण्याची शक्यता वर्तविली जात होती. त्यातच येत्या दोन, तीन वर्षांत नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर नाशिकची जागा भाजपला व धुळ्याची जागा शिवसेनेला सुटेल, असा एकंदरीत अंदाज होता. त्यामुळे भुसे समर्थकांच्याही आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्या दृष्टिकोनातून भावी खासदार अशा आशयाच्या पोस्टदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. परंतु भाजपने बुधवारी राज्यातील 20 लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यात धुळे लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ. भामरे यांच्यावर पुन्हा पक्षाने विश्‍वास दाखवत हॅट्ट्रिक करण्याची संधी दिल्यामुळे खासदारकीसाठी इच्छुक असणार्‍यांचा पुरता हिरमोड झाला आहे. त्यामुळे खासदाकीचे स्वप्न पाहणार्‍या या भावी खासदारांचे स्वप्न सध्या तरी भंगले आहे, असे म्हटले तर ते अनाठायी ठरणार नाही. 

हेही वाचा :

Back to top button