Dhule News : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दुसऱ्यांदा जाळ्यात, 40 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले | पुढारी

Dhule News : सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दुसऱ्यांदा जाळ्यात, 40 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले

धुळे : पुढारी वृत्तसेवा– न्यायालयात सकारात्मक अहवाल पाठवण्यासाठी 40 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या धुळ्याच्या आझाद नगर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक उपनिरीक्षकाला रंगेहात पकडण्यात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या पथकाला यश आले आहे. विशेषता याच पोलीस कर्मचाऱ्याला 2010 मध्ये 70 हजाराची लाच घेतल्या प्रकरणात पाच वर्षाची शिक्षा झाली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर तो पुन्हा सेवेत आला होता.

या संदर्भात तक्रार देणाऱ्या व्यक्तीच्या चुलत भावाचे 22 ऑगस्ट 2021 रोजी अपघाती निधन झाले होते. त्यांनी त्यांच्या हयातीत इन्शुरन्स कंपनीकडून वैयक्तिक दोन कोटी रुपयांचा विमा पॉलिसी घेतली होती. त्यांच्या मृत्यूनंतर विमा प्रतिनिधीने या पॉलिसीची रक्कम वारसाच्या नावे जमा न करता परस्पर दुसऱ्याच्या नावे जमा करून फसवणूक केल्याने या संदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यांच्याकडे आहे. या गुन्ह्यात दुसऱ्याच्या नावे जमा झालेली रक्कम गोठवण्यात आली होती. ही विम्याची रक्कम मूळ वारसाच्या खात्यात जमा होण्यासाठी तक्रारदार यांच्या वहिनीने न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जावरून न्यायालयात सकारात्मक अहवाल देण्यासाठी तक्रारदाराच्या परिवाराने तपासी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरीफ अली सय्यद यांच्याशी संपर्क केला. अहवाल पाठवण्यासाठी या पोलीस कर्मचाऱ्याने 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी धुळ्याचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक अभिषेक पाटील यांना भेटून तक्रार दिली. या तक्रारीची पडताळणी केली असता सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरीफ अली सय्यद यांनी तडजोडी अंती 40 हजार रुपयांच्या रकमेची मागणी केली. ही रक्कम पारोळा रोडवरील गिंदोडिया चौकातील भाग्यश्री पान कॉर्नर समोर देण्याचे ठरले. त्यानुसार या ठिकाणी उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजीत सिंग चव्हाण, तसेच हेमंत बेंडाळे व रूपाली खांडवी तसेच कर्मचारी राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, यांनी भाग्यश्री पान कॉर्नरच्या जवळ सापळा लावला. यावेळी सय्यद यांनी पैसे स्वीकारताच त्यांना रंगेहात पकडण्यात आले. या संदर्भात आझाद नगर पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी देखील झाली होती कारवाई

दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरीफ अली सय्यद हे सोनगीर पोलीस ठाणे येथे कार्यरत असताना त्यांना 22 जुलै 2010 रोजी एका प्रकरणात 70 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले होते. त्यांच्याविरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना 2013 मध्ये पाच वर्षाची शिक्षा दिली होती. त्यामुळे त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ देखील करण्यात आले होते. यानंतर उच्च न्यायालयाने 2019 मध्ये त्यांना दिलासा दिल्याने सय्यद हे पुन्हा पोलीस खात्यात हजर झाले आहेत. मात्र आता पुन्हा ते लाचेच्या प्रकरणात अडकले आहेत.

हेही वाचा :

Back to top button