Nashik News : महिलेला रेल्वेत घडले माणुसकीचे दर्शन, परराज्यातील पोलिसांनी केली मदत | पुढारी

Nashik News : महिलेला रेल्वेत घडले माणुसकीचे दर्शन, परराज्यातील पोलिसांनी केली मदत

देवळा (जि. नाशिक) ; पुढारी वृत्तसेवा- ‘सद्गरक्षणाय खलनिग्रहणाय’ या पोलीस खात्याच्या ब्रीद वाक्याची प्रचिती देवळा तालुक्यातील भाविकांना आस्था ट्रेन मध्ये आली. मदतीला धावून आल्याने एमपीच्या पोलिसांचे भाविकांनी कौतुक केले.

आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या माध्यमातून देवळा तालुक्यातील भाविक आस्था ट्रेन ने अयोध्याला गेले होते. अयोध्यातून प्रभू रामाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू असतांना ट्रेन मधील देवळा येथील सफाई कर्मचारी महिला अनिता माळी या इटारसी स्टेशन वर अल्पोपहार खरेदी करण्यासाठी उतरल्या असतांना त्यांनी ५०० रुपये सदर दुकानदारास दिले  व क्षणार्थात ट्रेन सुरु झाली. त्यामुळे महिलेने धावपळीत रेल्वे गाठली पण महिलेचे उर्वरित पैसे दुकानदाराकडेच राहिले.

हा प्रसंग येथील किशोर चव्हाण, बंडू शेवाळकर व अन्य यात्रेकरूंनी यावेळी रेल्वे पोलिसांना सांगितला. मात्र तो पर्यंत दीडशे किलोमीटर ट्रेन पुढे आली होती. त्यानंतर अवघ्या एक ते दिड तासांत संबंधित पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून इटारसी रेल्वे स्टेशनवर संपर्क करुन सदर महिलेचे शिल्लक पैसे पोलिसांनी फोन पे द्वारे मागवून गरीब महिलेला परत केले.

परराज्यातील  पोलिसांकडून  माणुसकीचे दर्शन घडल्याने यावेळी महिलेच्या चेहऱ्यावर निखळ आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी रेल्वेतील सर्वांनीच पोलिसांच्या वर्दित देवदुत पाहिले. सर्वच उपस्थित प्रवाशांनी ह्या कामगिरीचे पोलिसांचे टाळ्या वाजवून कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली. कायदा व सुव्यस्था राखणाऱ्या खाकी वर्दीला खऱ्या अर्थाने दाद द्यावी लागेल. ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून, परराज्यातील पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचे कौतुक होत आहे .

हेही वाचा :

Back to top button