भुजबळांच्या पुत्रावरही मराठा आंदोलकांचा रोष, वाट अडवून घोषणाबाजी… | पुढारी

भुजबळांच्या पुत्रावरही मराठा आंदोलकांचा रोष, वाट अडवून घोषणाबाजी...

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा- राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांना त्यांनी मराठा आरक्षणाविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्याच मतदारसंघातील मराठा बांधवांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. आता तसाच काहीसा अनुभव त्यांचे पुत्र व व नांदगावचे माजी आमदार पंकज भुजबळ यांनाही आला आहे.

पंकज भुजबळ हे गुरुवारी (दि. २२) नांदगाव मतदार संघातील परंतु मालेगाव तालुक्यात येणाऱ्या गावांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांना बहाणे येथे मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांनी भुजबळ यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याने त्यांना माघारी परतावे लागले. त्यामुळे मराठा आंदोलक व भुजबळ परिवार यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.

राज्य शासनाने सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी केली नसल्यामुळे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी रास्ता रोकोसह आमदार, खासदार मंत्र्यांना दारात फिरकू देऊ नका, असे आदेश दिले आहेत. त्याचा पहिला फटका माजी आमदार भुजबळ यांना बसला. माजी आमदार भुजबळ हे गुरुवारी तालुक्यातील मांजरे, कौळाणे, नगाव (दि.), टाकळी, वहाणे आदी गावांच्या दौऱ्यावर होते. मांजरेकडे जात असताना मराठा आंदोलकांनी वहाणे येथे भुजबळ यांची वाट अडवून जोरदार घोषणाबाजी केली. घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी धाव घेत आंदोलकांची समजूत काढली, मराठा आरक्षणाचा तिढा जोर्पत सुटत नाही. तोपर्यंत भुजबळ कुटुंबीयांनी मतदारसंघात फिरू नये असा इशाराच यावेळी मराठा आंदोलकांनी दिला.

मराठा समाज आक्रमक झाल्याने माजी आमदार भुजबळ यांना दौरा अर्धवट सोडून अखेरीस माघारी परतावे लागले. यावेळी पंचायत समितीचे माजी सदस्य गणेश खैरनार, यतीन खैरनार, जिभाऊ देवरे, प्रशांत पवार, नाना खैरनार, भरत पवार आदी उपस्थित होते.

Back to top button