Goda Mahaarti : गोदावरीची आज शासकीय महाआरती | पुढारी

Goda Mahaarti : गोदावरीची आज शासकीय महाआरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महिनाभरापासून गोदावरी महाआरती (MahaArati) वरून वाद पेटला असतानाच शासन गठीत रामतीर्थ गोदावरी समितीने सोमवारी (दि. १९) गोदापूजन व महाआरतीचे आयोजन केले आहे. समितीच्या महाआरतीवर पुरोहित संघ व साधू-महंतांनी पहिलेच बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे वादाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या महाआरतीकडे (MahaArati) अवघ्या नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

रामतीर्थ गोदावरी (Godawari River) समितीच्या महाआरतीला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने समितीकडून सकाळी ११ वाजता गोदापूजन होणार आहे. तसेच सायंकाळी साडेपाचला सांस्कृतिक कार्यक्रम त्यानंतर गोदावरीची महाआरती करण्यात येणार आहे. पंचवटीमधील दुतोंड्या मारुतीजवळ हे सर्व कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती समितीचे प्रवक्ते नरसिंहकृपा दास व सहप्रवक्ते राजेंद्र फड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

रामतीर्थ गोदावरी समितीच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, दक्षिण भारतात प्राचीन गंगा असलेल्या जीवनदायीनी गंगा-गोदावरीचे (Godawari River) पवित्र योगदान देव-देवता, ऋषी, महर्षी, मानव जीवन, संस्कृती संबंधित क्षेत्रे आणि निसर्ग यांच्या आयुष्यात मोलाचे स्थान आहे. तिच्या तीर्थरूप जलाचा अभिषेक पुण्यप्राप्ती करून देतो. कुंभपर्वातील देवांचे वसतिस्थान असलेली गंगा-गोदावरी नदी (Godawari River) आपल्यासाठी वंदनीय आहे. अशा पवित्र गोदामातेच्या स्मृती धर्मशास्त्र, पुराण, इतिहास व काव्यग्रंथात विखुरल्या व रुजलेल्या आहेत. त्या पुढच्या पिढीत संक्रमित व्हाव्यात व मानवी संस्कृतीत अधिक सुसंस्कृतता, कला व सभ्यता निर्माण व्हावी यासाठी सर्वांच्या साक्षीने गोदावरी जन्मोत्सव पूजन व महाआरती (MahaArati) संपन्न हाेणार असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली आहे.

प्रमुखांची लाभणार उपस्थिती
डॉ. सखा सुमंत महाराज यांच्या हस्ते गोदारतीचे (MahaArati) उद‌्घाटन होणार आहे. त्यानंतर धर्मगुरू स्वामी अमृताश्रम महाराज हे मार्गदर्शन करतील. विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय मंत्री दादा वेदक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सोहळ्यासाठी आमदार राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे व सरोज अहिरे या स्वागत प्रमुख असतील. सोहळ्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. या पुण्य प्रसाद देणाऱ्या पूजन व आरतीस सहभागी व्हावे, असे आवाहन नरसिंहकृपा दास व राजेंद्र फड यांनी नाशिककरांना केला आहे.

हेही वाचा:

Back to top button