Nashik Goda Aarti : गोदा आरतीसाठी पोलीस संरक्षण मिळावे, रामतीर्थ गोदावरी समितीची मागणी | पुढारी

Nashik Goda Aarti : गोदा आरतीसाठी पोलीस संरक्षण मिळावे, रामतीर्थ गोदावरी समितीची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दक्षिण वाहिनी गोदावरीच्या महाआरतीवरुन पुरोहित संघानंतर रामतीर्थ गोदावरी सेवा समितीने जिल्हा प्रशासनाकडे धाव घेतली आहे. समितीच्या सदस्यांनी शुक्रवारी (दि.१६) जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेत सोमवारी (दि.१९) महाआरतीवेळी पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. त्यावर प्रत्यक्ष परिस्थिती विचारात घेऊन निर्णय घेतला जाईल, असे शर्मा यांनी स्पष्ट केले. (Nashik Goda Aarti)

वाराणसीच्या धर्तीवर गोदावरीचा भव्यदिव्य आरती करण्यात येणार आहे. यानिमित्ताने नाशिकचे ब्रॅण्डींगची संधी नाशिककरांना चालून आली आहे. मात्र, आरतीच्या आयोजनावरून पुराेहित संघ व शासन गठीत समितीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. साधु-महंत व पुरोहित संघाने गुरुवारी (दि. १५) जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनीही जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला पोहचले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांची बाजू मांडली. (Nashik Goda Aarti)

रामतीर्थावर फक्त पुरोहित संघाचा अधिकार असणे चुकीचे आहे. मात्र, तरीही सोमवारी (दि.१९) सायंकाळी ७ वाजता आम्ही दुतोंड्या मारुतीजवळ गोदाआरतीस प्रारंभ करत आहे. त्यावेळी श्रीमद डॉ. सुमंताश्रम महाराज, श्री अमृत आश्रम स्वामी महाराज, इस्कॉनचे ब्रह्मचारी शिक्षाष्टकम दास, विश्व हिंदु परिषदेचे दादा वेदक, आमदार देवयानी फरांदे, राहुल ढिकले, सीमा हिरे व सरोज अहिरे यांना निमंत्रण दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी शर्मा यांना सांगितले. पुरोहित संघाचा विरोध लक्षात घेता आरतीवेळी संरक्षण देण्याची मागणी केली. (Nashik Goda Aarti)

शासनाला अहवाल : शर्मा

गोदावरी महाआरतीसंदर्भात पुराेहित संघ व सेवा समिती अशा दोन्ही संघटनांचे म्हणणे आपण एैकून घेतले आहे. त्यानूसार शासनाला लेखी अहवाल सादर केला आहे. शासनाच्या सूचनेनूसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न बघता त्यावेळी परिस्थिती पाहून निर्णय घेऊ असेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

गोदावरी नदी ही सर्वांची असून कुणीही तीची आरती करु शकतो. येत्या सोमवारी गोदाआरतीचा शुभारंभ होत आहे. त्याबाबतचे निमंत्रण सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही दिले आहे. नाशिकची ही आरती भव्य स्वरुपातच होईल.

-जयंत गायधनी, अध्यक्ष, रामतीर्थ गोदावरी सेवा समिती.

हेही वाचा :

Back to top button