महिला लैंगिक छळ अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मानसिकतेत बदलाची आवश्यकता | पुढारी

महिला लैंगिक छळ अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मानसिकतेत बदलाची आवश्यकता

धुळे : पुढारी वृत्तसेवा- कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम व कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी समाजातील मानसिकतेत बदल करण्याची गरज असल्याचे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधिश संदीप स्वामी यांनी व्यक्त केले.

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, संरक्षण व निवारण) अधिनियम 2013 व कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 संदर्भात कार्यशाळा आज संपन्न झाली, त्यावेळी न्या. स्वामी बोलत होते. या कार्यशाळेस जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, आयकर विभागाचे आयुक्त जय स्वामी, बाल कल्याण समितीचे सदस्य विजय देशमुख, संरक्षण अधिकारी मधुली वाड, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेंमत भदाणे, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रघुनाथ महाजन, दामिनी पथक प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक मीना तडवी, धुळे जिल्हा युनिसेफ समन्वयक नंदु जाधव, जिल्हा परिविक्षा अधिकारी जी.ए.जाधव, दिनेश लांडगे, अर्चना पाटील आदी उपस्थित होते.

न्यायाधीश संदीप स्वामी म्हणाले की, मॉ. जिजाऊ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना परस्त्रीचा सन्मान करण्याचे शिकविले आणि त्यांची शिकवण घेवूनच छत्रपती शिवाजी महाराज घडत गेले. त्यानी कुठल्याही परस्त्रीचा कधीही अपमान केला नाही. म्हणजे मुळात आपल्या आई-वडीलांचे संस्कार मुलांमध्ये उतरत असतात. त्यामुळे महिलांच्या सुरक्षितेसाठी शासनाने अनेक कायदे, अधिनियम तयार केले आहे. या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल तर समाजामधील मानसिकता बदलणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक महिलांनी आपल्या मुलांना एक आदर्श मुलगा होण्यासाठी योग्य शिकवण दिली पाहिजे. परस्त्री व महिलांविषयक आदर करण्याचे शिकवुन असा निर्धार केल्यास प्रत्येक महिला ही सुरक्षित राहील. त्याचप्रमाणे जोपर्यंत तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवित नाही तोपर्यंत समाजातील ही विकृती थांबणार नाही. त्यामुळे या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करायची असेल तर स्वतः महिलांनी कणखर व खंबीर व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे कुठलीही लैंगिक छळाबाबत घटना घडल्यास घाबरुन न जाता महिलांनी तक्रार करावी असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा पोलीस अधिक्षक धिवरे म्हणाले की, कौटुंबिक हिंसाचार व महिलांचा लैगिक छळ (प्रतिबंध, संरक्षण व निवारण) अधिनियम हे दोन्ही कायदे समाजासाठी खुप उपयुक्त आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ज्या गाईडलाईन्स आखुन दिल्यात. त्यांचा आपण गांर्भियाने अभ्यास केला तर अशा कायद्याची मोठी गरज आपल्या समाजाला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी यावेळी त्यांना सेवाकाळात आलेले काही अनुभव उपस्थितांना सांगितले.

यावेळी आयकर आयुक्त जय स्वामी, दामिनी पथक प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक मीना तडवी, प्राचार्य डॉ. रघुनाथ महाजन, युनिसेफ समन्वयक नंदु जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यशाळेचे प्रास्ताविकात बोलतांना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजेंद्र बिरारी म्हणाले की, कौटुंबिक हिंसाचारपासून महिलांचे संरक्षण अधिनियम, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैगिक छळ (प्रतिबंध, संरक्षण व निवारण) अधिनियमाची माहिती संबंधित यंत्रणांना व्हावी तसेच कायद्यांची जिल्हास्तरावर जनजागृती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यशाळा घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यशाळेचे आभार प्रदर्शन जिल्हा परिविक्षा अधिकारी जी.ए.जाधव , संरक्षण अधिकारी मधुली वाड, श्रीमती. पिंपळे यांनी केले. यावेळी बाल विवाह प्रतिबंध प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले. या कार्यशाळेस जिल्ह्यातील सर्व आस्थापनामधील अंतर्गत तक्रार समितीचे अध्यक्ष व तालुकास्तरीय नोडल अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button