नाशिक : रुग्णाचे नातेवाईक अन् सुरक्षारक्षकांमध्ये फ्री स्टाइल | पुढारी

नाशिक : रुग्णाचे नातेवाईक अन् सुरक्षारक्षकांमध्ये फ्री स्टाइल

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील महापालिकेच्या बिटको रुग्णालयामध्ये सोमवारी (दि. १२) पहाटे पेशंटचे नातेवाईक आणि सुरक्षारक्षकांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी झाली. रुग्णाची तब्येत गंभीर कशाने झाली याबाबत विचारणा केल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे सांगितले जाते आहे.

देवीदास चंद्रकांत चव्हाण (55, रा. बागूलनगर, विहितगाव) असे संबंधित पेशंटचे नाव आहे. त्यांना शनिवारी (दि. १०) सकाळी बिटको रुग्णालयात उच्च रक्तदाब व मधुमेह आजाराच्या उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. त्यांच्यासोबत पत्नी संगीता आणि मुले होती. परंतु रविवारी दुपारच्या दरम्यान येथील कर्मचाऱ्यांनी तुमच्या वडिलांची तब्येत ठीक आहे. तुम्ही आता घरी जाऊ शकता, असे पेशंटच्या नातेवाइकांना सांगितले. त्यामुळे सर्व जण घरी झोपण्यासाठी गेले. मात्र, अचानक पहाटे तीनच्या दरम्यान बिटको रुग्णालयातून कॉल आला की, तुमच्या पेशंटची तब्येत गंभीर झाली असून, त्यांना संदर्भ रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात दाखल करावे लागणार आहे. त्यावेळी पेशंटचे नातेवाईक बिटको रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी आमच्या पेशंटला अचानक काय झाले, अशी विचारणा केली. मात्र, याविषयी संबंधित कर्मचारी आणि डॉक्टर समाधानकारक उत्तर देत नसल्याच्या कारणामुळे पेशंटचे नातेवाईक आणि सुरक्षारक्षक, डॉक्टर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याने त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पेशंटच्या नातेवाइकांची समजूत काढून संबंधित रुग्णाला संदर्भ रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या संदर्भात बिटको येथील कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.

बिटकोतील पोलिस चौकी बंद
बिटको रुग्णालयात यापूर्वी पोलिस चौकी सुरू करण्यात आली होती. परंतु, पोलिसांनी या ठिकाणाहून काढता पाय घेतला.अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण देत, पोलिसांनी या ठिकाणी सुरू असलेली पोलिस चौकी बंद केली आहे. त्यामुळे आयुक्त डॉ. अशोक करजंकर यांनी सोमवारी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांना पत्र लिहित बिटकोत तातडीने पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी केली. तसेच डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयांसह अन्य रुग्णालयांमध्ये पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी त्यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.

या ठिकाणी हव्या पोलिस चौकी
– जे.डी.सी. बिटको रुग्णालय, नाशिकरोड
– डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय, द्वारका
– इंदिरा गांधी रुग्णालय, पंचवटी
– स्वामी समर्थ रुग्णालय, मोरवाडी
– गंगापूर हॉस्पिटल, गंगापूर
– जिजामाता प्रसूतिगृह, मेनरोड
– मायको प्रसूतिगृह, सातपूर
– उपनगर प्रसूतिगृह, उपनगर
– सावित्रीबाई फुले प्रसूतिगृह, सिन्नर फाटा

Back to top button