Manoj Jarange Patil | आरक्षणाला आडवे आलात तर मंडल आयोगाला चॅलेंज

शासकीय विश्रामगृह येथे मनोज जरांगे-पाटील यांचे स्वागम करताना मराठा समाजबांधव (छाया: हेमंत घोरपडे)
शासकीय विश्रामगृह येथे मनोज जरांगे-पाटील यांचे स्वागम करताना मराठा समाजबांधव (छाया: हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

'जशी तुमची लेकरं आहेत, तशीच आमची पण आहेत. तुम्ही जगा आणि आम्हालाही जगू द्या. मात्र, आमच्या आरक्षणाला आडवे याल तर मंडल आयोगाला चॅलेंज करावे लागेल' असा इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी दिला. यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळांवर निशाणा साधताना, 'मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात भुजबळ तीन वेळा आडवे आलेत, आता त्यांनी ते सोडून द्यावे, ओबीसी समाजाने त्यांना समजवावे' असे आवाहन केल. नाशिक दौऱ्यावर आलेल्या जरांगे-पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जरांगे म्हणाले की, '१० फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषणाचा इशारा दिल्यानंतर सरकारशी कुठलीही चर्चा झाली नाही. मात्र, मंगळवार, बुधवारी होणारी कॅबिनेट सोमवारी घेतल्याची माहिती समजली आहे. त्यात निर्णय घेतल्याचे ऐकिवात आहे. ओबीसीला ज्या २०२१ कायद्याने आरक्षण दिले आहे, त्यात दुरुस्ती करून येत्या विशेष अधिवेशनात मराठा समाजासाठी काढलेल्या अधिसूचनेचे १५ फेब्रुवारी रोजी कायद्यात रूपांतर करावे, इतकीच आमची मागणी आहे. तसेच सरकारने सांगितल्याप्रमाणे सगेसोयरे आदेशाची अंमलबजावणी सुरू करावी. याशिवाय मराठा समाजावरील आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी आमची मागणी होती. मात्र, त्याचीही पूर्तता झाली नसल्याने उपोषण करीत असल्याचे जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले. यावेळी भुजबळांचा समाचार घेताना जरांगे-पाटील म्हणाले, 'दुसऱ्याच्या अन्नात माती कालवणे एवढेच त्यांचे काम आहे. ते ज्या पक्षात जातात, तो मोडीत काढतात. स्वत:चे कुटुंबही त्यांनी मोडीत काढले आहे. आता ते ओबीसी बांधवांच्या मागे लागले आहेत. त्यांचा तो धंदाच झाला आहे. खरं तर ते पार गळायला आले होते, त्यांना बळच का होईना पैलवान म्हणून तयार केले आहे. ओबीसी आरक्षणात जायचे नाही, असे म्हटले होते. पण आम्ही सरसकट गेलो. आम्हाला मंडल कमिशनला चॅलेंज करायचे नाही. पण गोरगरिबांच्या अन्नात माती कालवली जात असेल तर सहन करणार नाही. कितीदा सहन करावे? मागास सिद्ध झालो तेव्हाही भुजबळांनी चॅलेंज केले. राणे समिती अन् ओबीसी सवलतीवेळीदेखील हाच प्रकार. आता नाइलाजाने मंडल आयोगाला चॅलेंज करावेच लागेल, असेही जरांगे-पाटील म्हणाले. यावेळी विलास पांगारकर, करण गायकर, नानासाहेब बच्छाव, जगदीश शेजवळ, चंद्रकांत बनकर ,नितीन रोटे-पाटील, योगेश नाटकर, विकी गायधनी आदी उपस्थित होते.

..तर २७ टक्के आरक्षण घालवणार
पाया पडून बघितले. मध्यस्थी टाकलेत, विनंत्या केल्या सोयरीक जोडली, त्यांनीच मोडून टाकली. आता किती दिवस आम्ही बिगरलग्नाचं राहायचं. त्यांनी बिगरलग्नाचे राहून बघावे, मग कळेल. समोरचा गप्प बसायला तयारच नसेल तर मग देशातील २७ टक्के आरक्षण घालवण्याशिवाय पर्याय नाही, अशा शब्दांत मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांचा समाचार घेतला. भुजबळांच्या राजीनाम्यावर बोलताना, ते राजीनामा देणारे नसून, घेणारे असल्याचीही टीका केली. तसेच नाशिक बालेकिल्ला त्यांचा नसून, जनतेचा असल्याचेही म्हटले. मरण हातावर घेऊन पुन्हा समाजासाठी १० तारखेपासून संघर्ष करणार असल्याचेही जरांगे-पाटील यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे चांगले व्यक्तिमत्त्व
राज ठाकरे यांचे व्यक्तिमत्व चांगले आहे. त्यांच्या पाठीशी मराठा समाजातील तरुणवर्ग मोठ्या प्रमाणावर आहे. ते आरक्षणाविरोधात कधीच काही बोलत नाहीत. नाशिकला आल्यानंतर ते काही बोलले असतील, तर नाशिकचे पाणी तसेच असल्याचे म्हणत जरांगेंनी भुजबळांचे नाव न घेता टीका केली. ठाकरे यांचा तो प्रश्न नाशिकपुरताच मर्यादित असल्याचेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news