धुळे : नवप्रविष्ठ पोलीसांनी कर्तव्यासोबत कायद्याचे देखील पालन करावे – जिल्हाधिकारी अभिनव गोयल | पुढारी

धुळे : नवप्रविष्ठ पोलीसांनी कर्तव्यासोबत कायद्याचे देखील पालन करावे - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

धुळे : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र पोलीस दलात नवप्रविष्ठ झालेल्या पोलीसांचा समाजात वावर असतांना जनतेशी प्रत्यक्ष संबंध येणार आहे. आपले कर्तव्य व कायद्याचे पालन या दोन्ही गोष्टींची सांगड घालुन जनतेच्या भावनेचा आदर करत कर्तव्यासोबत कायद्याचे पालन करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज दि. 7 रोजी नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींच्या 10 व्या दीक्षांत संचलन सोहळ्यात केले.

कवायत मैदानावर पार पडलेल्या पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे येथे सत्र क्रमांक 10 मधील 627 नवप्रविष्ठ पोलीस प्रशिक्षणार्थींचा दीक्षांत समारंभप्रसंगी गोयल बोलत होते.  यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधिक्षक एस.ऋषीकेश रेड्डी, उपवनसंरक्षक नितिन सिंग, पोलीस प्रशिक्षण केंन्द्राचे प्राचार्य विजय पवार, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे पोलीस उपअधिक्षक चंद्रकांत पावसकर, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 6 चे पोलीस उपअधीक्षक प्रदीप पारखे, गुलाबराव खर्डे, उपप्राचार्य रामकृष्ण पवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी म्हणाले की, पोलीस प्रशिक्षण केंद्र, धुळे येथे राज्यातील विविध घटकातून आलेल्या प्रशिक्षणार्थींनी येथे मुलभूत प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले आहे. या प्रशिक्षण कालावधीत एक जबाबदार आणि कर्तव्य दक्ष पोलीस अंमलदार बनविण्यासाठी आवश्यक असलेला अभ्यासक्रम तयार करुन सर्व प्रकारचे मुलभुत प्रशिक्षण देण्यात आले आहे. परंतु संस्थेबाहेर पडुन प्रत्यक्ष कर्तव्यावर रुजू झाल्यावर कालानुरुप होणारे बदल आत्मसात करुन नवनविन शिक्षणाची आस कायम ठेवावी. महाराष्ट्र पोलीस दलात भरती झाले असून समाजात वावरतांना प्रत्यक्ष जनतेशी संबंध येणार आहे. कर्तव्य व कायद्याचे पालन यांची सांगड घालुन व जनतेच्या भावनेचा आदर करुन कर्तव्य चांगल्याप्रकारे पार पाडण्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. आपण समाजाचे एक जबाबदार घटक आहात याची जाण ठेवली पाहिजे. प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची गरज आहे. भविष्यात कुटूंबाकडेही लक्ष द्या. त्यासोबत कर्तव्यही तेवढेच प्रामाणिकपणे व निष्ठेने सांभाळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पोलीस प्रशिक्षण केंन्द्राचे प्राचार्य पवार म्हणाले की,  या प्रशिक्षण केंद्रात आजपर्यंत 882 कवायत निदेशक यांना 12 सत्रात यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले असून संस्थेत आजपर्यंत 924 नवप्रविष्ठ महिला पोलीस शिपाई व 2 हजार 190 पुरुष पोलीस शिपाई असे एकूण 3 हजार 114 यांनी मुलभुत प्रशिक्षण घेतले आहे. तसेच 1 हजार 35 नवप्रविष्ठ पुरुष, महिला, होमगार्ड यांनी राज्याच्या विविध घटकातून प्रशिक्षण घेतले आहे. तसेच पोलीस उपनिरीक्षक इंडक्शन कोर्स, प्रशिक्षणाकरिता राज्यातील विविध घटकातून 1 हजार 821 पोलीस उपनिरीक्षक यांना तसेच 10 वर्ष व 20 वर्ष पोलीस दलात सेवा झालेले पोलीस अंमलदार यांच्याकरीता प्रोफेशनल स्कील अपग्रेडेशन, 2 हजार 35 प्रशिक्षणार्थींना कायद्याचे ज्ञान व प्रात्याक्षिक देण्यात आले आहे. हे रिक्रुट महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात वेगवेगळया घटकांमध्ये उत्तमपणे कामगिरी बजावुन महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा संपूर्ण देशात अभिमानाने उंचवित असल्याचे सांगितले.

सत्कारार्थी असे…
यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते पोलीस प्रशिक्षण सत्र 10 चे विजेत्या प्रशिक्षणार्थ्यीचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्यात आंतरवर्ग प्रथम सिध्देश कोले, बाह्यवर्ग प्रथम चेतन महाले, सर्वोत्कृष्ठ गोळीबार शिवाजी कोटाळे, सर्वोत्कृष्ठ कमांडो सौरव मसुरकर, सर्वोत्कृष्ठ खेळाडू लक्ष्मण दरवडा, सर्वोत्कृष्ठ टर्नआऊट हर्षद साळुंखे, सर्वोत्कृष्ठ शारिरीक कवायत चेतन महाले, सर्वोत्कृष्ठ द्वितीय अतुल गुरव, सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी सिध्देश कोले, आंतरवर्ग अधिकारी सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षक पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार, आंतरवर्ग अंमलदार सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षक सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रविण खैरनार, बाह्यवर्ग अधिकारी सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षक राखीव पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे, बाह्यवर्ग अंमलदार सर्वोत्कृष्ठ प्रशिक्षक सहायक पोलीस उपनिरीक्षक सचिन सांवत यांचा प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.

दीक्षांत समारंभात संचलन परेड करताना नवप्रविष्ठ पोलीस

कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथींना मानवंदना, परेड निरीक्षण, ध्वज टोळीचे आगमन, प्रशिक्षणार्थींना शपथ, दीक्षांत संचलन परेड करण्यात आली. कल्याणी कच्छवा यांनी सुत्रसंचलन केले. उपप्राचार्य रामकृष्ण पवार यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, प्रशिक्षणार्थ्यांचे पालक, नातेवाईक उपस्थित होते.

Back to top button