

धुळे : पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यात 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचे आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करून प्रत्येक पात्र लाभार्थ्याला जंतनाशकाची गोळी देवून राष्ट्रीय जंतनाशक मोहिम प्रभावीपणे राबवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्हा कार्यबल समितीच्या बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आज राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत भदाणे, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. तरन्नुम पटेल, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ.एस.बी.मोरे, जिल्हा हिवताप अधिकारी अ.रा.पाटील, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ.एम.आर.शेख यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गोयल यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात 13 फेब्रुवारी, 2024 रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहिम राबविण्यात येणार असून ग्रामीण व शहरी भागातील 1 ते 19 वर्षे वयोगटातील 6 लाख 60 हजार 214 मुलामुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. यासाठी शिक्षण, महिला व बाल विकास विभाग, आदिवासी विकास विभागाकडून लाभार्थी निश्चित करुन ॲल्बेडॅझोल गोळयांचे वितरण करावे, जंतनाशक गोळया सर्व शासकीय, शासकीय अनुदानित शाळा, आश्रमशाळा व खाजगी अनुदानित व अंगणवाडी केंद्रांना पोहचतील याची खात्री करावी. शालेय पटावर तसेच अंगणवाडी पटावर नसलेल्या लाभार्थ्यांना जंतनाशक दिन अथवा मॉप अप दिन जंतनाशक गोळी देण्याकरीता सर्व शाळाबाह्य मुले व मुलींची यादी करुन त्यांना जंतनाशक गोळी देण्यास आशा वर्करमार्फत अंगणवाडी केंद्रात आणावे. जंतनाशक गोळयांबाबत शिक्षकांना, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविकांना माहिती द्यावी. सार्वजनिक आरोग्य विभागासोबत समन्वय साधुन राष्ट्रीय जंतनाशक दिन परिणामकारकरित्या यशस्वीपणे राबविला जाईल असे नियोजन करावेत अशा सुचना त्यांनी दिल्यात.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बोडके म्हणाले की, 13 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील 1 हजार 892 शाळा, 2 हजार 209 अंगणवाडी इत्यादी ठिकाणी तसेच शासकीय व खाजगी शाळा, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व अंगणवाडी व शाळाबाह्य मुलामुलींना समुदायस्तरावर जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. यासाठी ग्रामीण भागात 1 हजार 465 व शहरी भागात 150 आशा सेविका, 403 आरोग्य कर्मचारी, 20 जिल्हास्तरीय पर्यवेक्ष, 109 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच 13 फेब्रुवारी रोजी जे विद्यार्थी गैरहजर, आजारपण अथवा काही कारणास्तव जंतनाशक गोळ्या घेऊ शकले नाहीत अशासाठी 20 फेब्रुवारी, 2024 रोजी होणाऱ्या मॉपअप दिनी अंगणवाडी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व घरोघरी जाऊन देण्यात येणार आहे.
लहान मुलांनी जंतनाशक औषधी घेतल्याने त्यांच्यातील रक्ताक्षयाचा आजार कमी होऊन आरोग्यात सुधारणा होते. तसेच बालकांचा शारीरिक व मानसिक विकास होऊन अन्य संसर्गांची प्रतिकार करण्याची क्षमता वाढते त्यामुळे ह्या गोळया मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी शासनामार्फत विनामूल्य देण्यात येतात. या औषधांचे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम नाहीत त्यामुळे 1 ते 19 वयोगटातील सर्व मुलांनी जंतनाशकाची गोळी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा शल्क चिकित्सक डॉ.देगांवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बोडके यांनी केले आहे.
बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमी दोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतांमुळे होतो. त्याचे प्रमुख कारण म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव होय. कृमी दोषांचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कातून आल्यामुळे सहजतेने होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालिन कृमी दोष हा व्यापक स्वरूपाचा असून मुलांना कमजोर करणारा आहे. कृमी दोष रक्ताक्षय, कुपोषणाबरोबरच बालकांची बौद्धिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. देशात प्रत्येकी दहा बालकांमागे सात बालकांमध्ये रक्ताक्षय आढळतो. ग्रामीण भागात हे प्रमाण जास्त असू शकते.
मोठया प्रमाणात जंतसंसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये तीव्र स्वरुपातील लक्षणे दिसून येतात. त्यात अतिसार, पोटदुखी, अशक्तपणा व मंदावलेली भूक यासारखी विविध प्रकारची लक्षणे दिसून येतात. सौम्य प्रमाणात संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये साधारणपणे कोणतीच लक्षणे दिसत नाही. जंतसंसर्गामुळे संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या आरोग्यावर विविध प्रकारचे दुष्परिणाम दिसून येतात. यामुळे रक्तक्षय होतो. बालकांचा विकास व शारीरिक वाढ खुंढते.
जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यावर नेहमी हात स्वच्छ धुवावेत, नेहमी शौचालयाचा वापर करावा. पायात चपला, बुट घालावेत, निर्जंतुक व स्वच्छ पाणी प्यावेत, व्यवस्थित शिजवलेले अन्न खावे, निर्जंतुक व स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुवावीत. नखे नियमित कापावीत व स्वच्छ ठेवावीत.
रक्तक्षय कमी होतो व आरोग्य सुधारते, बालकांची वाढ भराभर होते व ती निरोगी राहतात. अन्य संसर्गांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. बालकांची आकलनशक्ती सुधारते व ते अधिक क्रियाशील बनतात.
हेही वाचा :