अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; ७२ वर्षांनी अमळनेरात आजपासून सारस्वतांचा मेळा | पुढारी

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन; ७२ वर्षांनी अमळनेरात आजपासून सारस्वतांचा मेळा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन शुक्रवार (दि.२) पासून साने गुरुजी साहित्यनगरी, अमळनेरात सुरू होत आहे. त्यासाठी राज्यभरातील अनेक साहित्यिकांसह रसिक अमळनेरात दाखल झाले आहेत. १९५२ मध्ये साहित्य संमेलन झाल्यानंतर अमळनेरात पुन्हा एकदा ७२ वर्षांनी हे संमेलन दि. २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान होत आहे. त्यासाठी तीन सभामंडप उभारण्यात आले आहेत. यातील सभामंडप क्रमांक एकमध्ये उद्घाटन समारंभ होईल. याआधी वाडी संस्थानपासून सकाळी ७.३० वाजता ग्रंथदिंडीस प्रारंभ होईल. ग्रंथदिंडीचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे व जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते होईल.

सभामंडप क्रमांक एकमध्ये शुक्रवारी (दि. २) सकाळी १० वाजता प्रा. उषा तांबे यांच्या हस्ते ध्वजारोहण तसेच प्रकाशन कट्ट्याचे उद्घाटन होईल. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते ग्रंथदालनाचे उद्घाटन होईल. सकाळी १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होईल. प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे अध्यक्षस्थानी असतील. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन संमेलनाचे उद्घाटन करतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाषा-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर उपस्थित राहतील. दुपारी २ वाजता बालमेळाव्यातील निवडक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल. दुपारी ३.३० वाजता राजकीय आणि सामाजिक प्रदूषण यावर संत साहित्य हाच उपाय या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी ५.३० वाजता कविसंमेलन होईल. रात्री ८.३० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम होईल.

तर, सभामंडप क्रमांक दोनमध्ये दुपारी २ वाजता परिसंवाद होईल. ‌’कसदार मराठी राजकीय साहित्याच्या प्रतीक्षेत वाचक’ या विषयावरील परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी मुंबईचे प्रा. अविनाश कोल्हे असतील. दुपारी ३.३० वाजता ‌’सयाजीराव गायकवाड यांचे साहित्यिक व सामाजिक योगदान’ या विषयावर परिसंवाद होईल. छत्रपती संभाजीनगरचे बाबा भांड अध्यक्षस्थानी असतील. यात पुणे येथील डॉ. केशव तुपे व अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. रमेश माने सहभागी होतील. दुपारी ४.३० वाजता ‌’तृतीयपंथी समुदायाचे मराठी साहित्यातील चित्रण आणि स्थान’ या विषयावर परिसंवाद होईल. सायंकाळी ५.३० वाजता ‘स्वातंत्र्य संग्रामातील जनजातींचे योगदान’ या विषयावर परिसंवाद होईल. सभामंडप क्रमांक तीनमध्ये दुपारी २ ते सायंकाळी ७ पर्यंत कविकट्टा कार्यक्रम होईल. राजन लाखे आणि सहकारी या कविकट्ट्याचे संयोजक आहेत.

Back to top button