Dhule Crime News : धुळे महामार्गावर जीएसटीच्या नावाखाली लाखोंची लूट, वर्दीतील दोघा कर्मचाऱ्यांना बेड्या

Dhule Crime News : धुळे महामार्गावर जीएसटीच्या नावाखाली लाखोंची लूट, वर्दीतील दोघा कर्मचाऱ्यांना बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा- जीएसटी चुकविल्याच्या नावाखाली महामार्गावरून जाणाऱ्या असंख्य वाहन चालकांना अक्षरशः 71 लाखाचा गंडा घालण्यात आला. विशेषता हा प्रकार वर्दीतील दर्दी कर्मचाऱ्यांनीच केल्याची बाब उघडकीस आल्याने या दोघा कर्मचाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहे. या गुन्ह्यात आरोप असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बहिणीचा देखील तपासात समावेश आढळल्याने तिला देखील अटक करण्यात आल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. दरम्यान या गुन्हासाठी वापरण्यात आलेली शासकीय गाडी ही बड्या अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने देण्यात आल्याची चर्चा असून या गाडीचे लॉक बुक मधील नोंदीवरून आणखी आरोपी वाढण्याची शक्यता आहे.

धुळ्यातील महामार्गावरून जाणाऱ्या मालवाहू गाड्यांना अडवून त्यांची कागदपत्र तपासणीच्या नावाखाली जीएसटी चुकविल्याची थाप मारून लाखो रुपयाचा हेरफेर होत असल्याचा प्रकार घडत होता. त्यातच 4 जानेवारी 2024 रोजी पंजाब राज्यातील पटियाला येथे राहणारे काश्मीरसिंग सरदार हजारासिंग बाजवा या व्यापाऱ्याने तक्रार दिली. या तक्रारीमध्ये या व्यापाऱ्याची पीबी 11 सीझेड 0756 क्रमांकाची ट्रक जीएसटी अधिकाऱी असल्याचे भासवून तीन ते चार अनोळखी व्यक्तींनी अडवली. या तोतया अधिकाऱ्यांनी ट्रक मधील मालाच्या पावत्यांची पाहणी करून टॅक्स इन्व्हाईस बिलात फर्मच्या नावात चूक असल्याचे सांगून तक्रारदार बाजवा यांच्याशी मोबाईल वरील व्हाट्सअप द्वारे संपर्क साधला. यात जीएसटी चुकवल्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून 12 लाख 96 हजार रुपये दंडाची मागणी करण्यात आली. यानंतर तडजोड अंति एक लाख तीस हजार रुपये गुगल पे द्वारे स्वीकारण्यात आली. हा ट्रक पटियाला येथे गेल्यानंतर फिर्यादी बाजवा यांनी कागदपत्र पाहिले असता अशी कोणतीही चूक नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी स्थानिक जीएसटी विभागात संपर्क करून देखील माहिती दिली. तेथे देखील त्यांना चूक नसल्याचेच निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यांनी धुळ्यात येऊन फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तीन ते चार व्यक्तींच्या विरोधात 419 ,420 ,341 ,170 ,171 ,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या अधिकाऱ्यावर तपासाची जबाबदारी

या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला. त्याचप्रमाणे तपासाची व्याप्ती पाहता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक एस ऋषिकेश रेड्डी यांना देखील या तपासाची जबाबदारी सोपवली. त्यानुसार रेड्डी यांनी केलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या.

वर्दीतील दर्दींकडूनच गंडा

तोतया जीएसटी अधिकारी बनवून लूट करणारे संशयित हे पोलीस दलातच सेवेत असल्याचे निदर्शनास आले. त्याचप्रमाणे या कर्मचाऱ्यांनी अशी लूट करण्यासाठी शासकीय गाडीचा वापर केल्याची बाब देखील निदर्शनास आली. अधिक तपास केला असता या वर्दीतील दर्दी कर्मचाऱ्यांनी महामार्गावरून जाणाऱ्या अनेक वाहन चालकांना गंडा घातल्याचे निदर्शनास आले. यात 71 लाख 33 हजार 984 रुपयाची फसवणूक झाल्याचा प्राथमिक अंदाज तपासात पुढे आला आहे. या तपासाची माहिती देत असताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितले आहे की, या फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी अनेक बँकांचे खाते वापरले गेल्याचे तपासात पुढे येते आहे. तर आणखी एक मास्टर माईंड देखील अटक होणार आहे. विशेषता गुन्ह्यासाठी वापरलेल्या गाडीचे लॉक बुक जप्त करण्यात आले असून या लॉक बुक मधील नोंदी तपासल्या जात आहेत. या गुन्ह्यात पोलीस कर्मचारी बिपीन आनंदा पाटील तसेच इमरान इसाक शेख या सह नाशिक येथील स्वाती रोशन पाटील यांना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यासाठी वापरलेले वाहन बिपिन पाटील यांच्याकडे देण्यात आल्याचे देखील प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. त्याचप्रमाणे या गुन्ह्याचा संबंध जीएसटी विभागाशी असल्याने या विभागाचे अधिकारी देखील आपल्याला भेटले असून आवश्यक असेल तेव्हा तपासासाठी या अधिकाऱ्यांची देखील मदत घेतली जाणार असल्याची माहिती देखील धिवरे यांनी दिली आहे.

बडा अधिकारी कोण

विशेषता या गुन्ह्यामध्ये मास्टरमाइंड म्हणून एका बड्या अधिकाऱ्याचे नाव पुढे येते आहे. मात्र हा अधिकारी कोण हा प्रश्न पुढील तपासातूनच निष्पन्न होणार आहे. त्याचप्रमाणे मोटर विभागातून गुन्हा करण्यासाठी गाडी देण्यात आली असून ही गाडी एका बड्या अधिकाऱ्याच्या तोंडी आदेशानेच देण्यात आल्याची बाब देखील पुढे येत आहे. त्यामुळे शिस्तीचे खाते असलेल्या पोलीस दलात कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार या गुन्ह्यातून प्राथमिक अवस्थेत उघडकीस आला आहे.

पोलीस महानिरीक्षकांसमोर आव्हान

धुळ्यात जीएसटीच्या नावाखाली वाहन चालकांकडून लूट करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहन हे पोलीस दलाचेच असून ते बड्या अधिकाऱ्याच्या सांगण्यानुसार दिले गेले आहे. मात्र या बड्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे नाशिक विभागाचे नूतन विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. हा अधिकारी जिल्हा स्तरावरील मोठा अधिकारी असल्याची देखील चर्चा असून पुढील तपासात याचे नाव निष्पन्न झाले तरीही वरिष्ठांच्या सूचनेनुसारच त्याच्यावर कारवाई होणार असल्याची चर्चा देखील पोलीस दलात होते आहे. शिस्तीचे खाते असणाऱ्या अशा पोलीस दलात भ्रष्टाचार संपवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यानेच कर्मचाऱ्यांच्या टोळ्या बनवून लूट करण्याचे धंदे सुरू केल्याचा प्रकार देखील या गुन्ह्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या गुन्ह्याची संबंध असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडले जाऊ नये, अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त केली जाते आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news