Maratha Reservation Survey: दिवसभरात लाखभर कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे आव्हान

Maratha Reservation Survey: दिवसभरात लाखभर कुटुंबांच्या सर्वेक्षणाचे आव्हान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी 'इम्पेरिकल डेटा' संकलनाकरीता करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणात आतापर्यत तीन लाख ९४ हजार ११५ कुटूंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणासाठी बुधवारी (दि.३१) शेवटचा दिवस असून एका दिवसात शहरातील लाख भर कुटूंबाचे सर्वेक्षण करण्याचे आव्हान पालिकेच्या यंत्रणेसमोर आहे. दरम्यान, दिवसभरात एक लाख कुटूंबाचे सर्वेक्षण शक्य नसल्यामुळे महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे मुदतवाढ देण्याची मागणी केल्याचे समजते.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने इम्पेरिकल डाटा तयार करण्यासाठी मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील लोकांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने शहरी भागात महापालिकेवर इम्पेरिकल डेटा संकलित करण्याची जबाबदारी टाकली आहे. त्यासाठी महापालिकेचे २५९९ कर्मचारी प्रगणक म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. मंगळवार दि.२२ जानेवारी पासून शहरात सर्वेक्षणाला सुरूवात झाली. महापालिका हद्दीतील जवळपास पाच लाख १३ हजार मिळकती असून, या प्रत्येक घरात जाऊन हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. पहिल्या दिवशी शहरात ४८ हजार कुटूंबाचे सर्वेक्षण पार पडले. दुसऱ्या दिवसाअखेर हा आकडा एक लाख चार हजारांवर पोहोचला. तर मंगळवारी (दि.३०) सायंकाळपर्यंत शहरातील एकूण तीन लाख ९४ हजार ११५ कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात यश आले आहे. आता सर्वेक्षणासाठी आजचाच दिवस शिल्लक आहे. या एका दिवसात सुमारे लाखभर कुटुंबांचे सर्वेक्षण करण्याचे आव्हान प्रगणकांसमोर आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news