Nashik Tribal News | आदिवासी महिला झाल्या मशरूम उद्योजिका | पुढारी

Nashik Tribal News | आदिवासी महिला झाल्या मशरूम उद्योजिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अभिव्यक्ती मीडिया फॉर डेव्हलपमेंट व महिंद्रा अँड महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने माळेगाव येथील मातोश्री भीमाई आणि प्रगती महिला स्वयंसहाय्यता बचतगटामधील २५ महिलांनी मशरूमचे प्रशिक्षण घेत पहिल्याच प्रयत्नात ५० किलो मशरूम तयार करत उद्योजिका होण्याच्या दिशेकडे पाऊल टाकले आहे.

या महिलांना नाशिक येथील कृषी विज्ञान केंद्र येथे नोव्हेंबर महिन्यात प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर या महिलांनी ७० मशरूमचे बेड लावून त्यातून ५० किलो मशरूमचे उत्पादन घेतले. सेंद्रिय पद्धतीने मशरूम उत्पादित केल्याने महिलांनी आपल्याच गावात २०० रुपये किलोप्रमाणे विक्री केली. त्यातून एका दिवसात त्यांनी ६०० रुपयांची कमाई केली. या विक्रीतून महिलांचा आत्मविश्वास अधिक वाढल्याने त्यांनी आता शेडमध्ये पुन्हा १२५ मशरूम बेडची पेरणी केली आहे. त्यातून १५०० किलोपर्यंत मशरूमचे उत्पन्न निघेल अशी अपेक्षा या महिलांनी व्यक्त केली आहे.

गावातच शोधला रोजगाराचा मार्ग
सध्या मशरूम कोणत्या भागात अधिक विक्री होऊ शकते, याची चाचपणी या महिला करत असून, मोलमजुरीची कामे तसेच इतर गावांत स्थलांतरित होऊन काम करण्यापेक्षा आपल्याच गावात हा उद्योग अधिक चांगल्या पद्धतीने केला, तर मजुरी सुटू शकते असा विश्वास या महिलांनी व्यक्त केला. भीमाई महिला बचतगटाच्या अध्यक्षा अनिता मगर आणि प्रगती महिला स्वयंसहाय्यता बचतगटाच्या अध्यक्षा पूनम कसबे तसेच समन्वयक भीला ठाकरे यांचे मार्गदर्शन या महिलांना मिळत आहे.

Back to top button