Nashik Crime News : इसिसला नाशिकमधून ‘टेरर फडींग’, उच्चशिक्षीत अभियंत्याला अटक  | पुढारी

Nashik Crime News : इसिसला नाशिकमधून ‘टेरर फडींग’, उच्चशिक्षीत अभियंत्याला अटक 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा –  दहशतवादी संघटना इसिसला शहरातून एका उच्चशिक्षीत अभियंत्याने आर्थिक रसद पुरवल्याचा  धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दहशतवाद विरोधी पथकाने नाशिक शहरातील तिडके कॉलनी परिसरातून एका तरुणाला अटक केली आहे. हुजेफ अब्दुल अजीज शेख (३०) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.

दहशतवाद विरोधी पथकास सुरक्षा यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हुजेफची चौकशी करण्यात आली असून भौतिक पुराव्यांच्या  आधारे पथकाने हुजेफ यास अटक केली आहे. न्यायालयाने त्यास ३१ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. संशयित हा तिडके कॉलनीतील बाजीराव नगर परिसरात राहतो. पथकाच्या सखोल चौकशीत हुजेफ याचा परदेशात सतत वावर होता. तसेच त्याचे कॉल रेकॉर्ड, आर्थिक व्यवहारही सीरियाच्या सीमारेषा भागात सतत होत असल्याचे उघड झाले. त्यामुळे पथकाने त्याचा ताबा घेत चौकशी केली. त्यात हुजेफच्या नावे ४ ते ५ कंपन्या आहे. त्याचप्रमाणे इतर काही कंपन्यांमध्ये त्याची भागिदारी असल्याचे समोर आले आहे. त्याने दुबई, श्रीलंका, रियाध या देशांमध्ये सतत प्रवास व मुक्काम केल्याचे चौकशीत उघड झाले आहे. हुजेफ याने महाराष्ट्रासह, कर्नाटक, बिहार, तेलंगणा या राज्यांमधील बँकामधून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले व परदेशातही पैसे पाठवले.

महिलेच्या सांगण्यावरुन इसिसच्या बँक खात्यात पैसे

हुजेफ हा राबिया उर्फ उम ओसमा या महिलेच्या संपर्कात सतत होता. तिच्याच सांगण्यावरून हुजेफने दहशतवादी संघटना इसिसच्या सदस्यांच्या बँक खात्यात पैसे टाकल्याचा दावा पथकाने केला आहे. या टेरर फंडींगमध्ये इतर संशयित असल्याचा संशय पथकाने वर्तवला आहे. त्यादृष्टीने पथक तपास करीत आहेत.

Back to top button