Dhule News : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत मंजूर कामे तातडीने सुरू करावी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल | पुढारी

Dhule News : जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत मंजूर कामे तातडीने सुरू करावी : जिल्हाधिकारी अभिनव गोयल

धुळे : पुढारी वृत्तसेवा- जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत करण्यात येणा-या विविध मंजूर विकास कामांना गती द्यावी. ज्या कामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करुन कार्यारंभ आदेश द्यावे तसेच वितरीत झालेला निधी विहित मुदतीत खर्च करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल दिल्या.

आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक जिल्हाधिकारी गोयल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस मनपा आयुक्त अमिता दगडे-पाटील, हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.स॔भाजी भामरे, जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर, मनपा उपायुक्त संगिता नांदुरकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी शिल्पा नाईक, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, शासनाने सन 2023-2024 करीता प्रत्येक विभागास देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यतेस अनुसरून बीडीएस प्रणालीवर 70 टक्के उपलब्ध निधी उपलब्ध करुन दिला आहे. सदर उपलब्ध निधी खर्च झाल्यानंतर उर्वरीत 30 टक्के निधी मिळणार आहे. त्यामुळे ज्या विभागांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशा विभागांनी त्वरीत निविदा प्रक्रिया पुर्ण करुन कार्यारंभ आदेश देण्यात यावे. लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लक्षात घेता प्राप्त झालेल्या निधीचे योग्य नियोजन करुन तांत्रिक मान्यतेसह प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव त्वरीत सादर करावे. प्रत्येक विभागाने खरेदी प्रक्रिया विहित कालावधीत पुर्ण करावी. ज्या विभागांना अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास त्याची मागणी त्वरीत करावी. जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन यंत्रणांनी दर्जेदार विकास कामे होतील यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी. कृषि विभाग, जलसंधारण विभाग, मत्स्य व्यवसाय विकास, क्रीडा विभागाने मंजुर कामे त्वरीत सुरु करावेत. आरोग्य विभाग व पशुसंवर्धन विभागाने औषधे खरेदीची कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.

जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती हटकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत उपलब्ध निधी व खर्चाची माहिती यावेळी दिली. बैठकीत चालू वर्षाचा मंजूर निधी व झालेला खर्च यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button