नाशिक : पुढारी वृत्तसेवा– महापालिकेच्या नोकरभरतीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच भरतीची जाहिरात प्रसिध्द केली जाणार आहे. 'टीसीएस'मार्फत ही भरतीप्रक्रिया राबविली जात असून, आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समितीदेखील गठीत करण्यात आली आहे.
शहराचा विस्तार व लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत मूलभूत सेवा सुविधांचाही ताण महापालिकेवर वाढला आहे. १९९५ मध्ये महापालिकेच्या ७,०९२ पदांच्या आस्थापना परिशिष्टाला शासनाने मंजुरी दिली होती. 'क' संवर्गातील नाशिक महापालिकेची 'ब' संवर्गात पदोन्नती झाली. त्यानुसार कर्मचारी संख्याही वाढणे अपेक्षित असताना दरमहा सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीमुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांची सुमारे तीन हजार पदे रिक्त आहेत. जेमतेम ४,१०० कर्मचाऱ्यांच्या भरवशावर महापालिकेच्या कामकाजाचा गाडा हाकला जात आहे. त्यातही १,७५० पदे ही सफाई कर्मचाऱ्यांची आहेत. त्यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून सुधारित आकृतिबंध शासनाला सादर करण्याची तयारी केली जात आहे. मात्र, आकृतिबंधाचे सादरीकरण व त्यास शासनाची मंजुरी या प्रक्रियेला बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे.
कोरोना काळात तातडीची बाब म्हणून अग्निशमन विभागातील ३४८, तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदांच्या भरतीला शासनाने मंजुरी दिली आहे. यातील डॉक्टरांची ८२ पदे वगळता उर्वरित पदे भरतीसाठी महापालिकेने शासनाच्या निर्देशांनुसार टीसीएस कंपनीची निवड केली आहे. टीसीएसमार्फत करण्यात येणाऱ्या नोकरभरतीच्या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सरळसेवा पदभरती संदर्भातील इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समिती गठीत करण्यात आली आहे.
अशी आहे निवड समिती
आयुक्त डॉ. करंजकर यांच्या अध्यक्षतेखालील कर्मचारी निवड समितीत मनपातील अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त (कर) श्रीकांत पवार, मुख्य लेखापरीक्षक प्रतिभा मोरे, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी हे सदस्य आहेत. मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी म्हणून सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन रावते, तर अल्पसंख्याक प्रतिनिधी म्हणून उपअभियंता महंमद एजाज काझी यांची नियुक्ती झाली आहे. उपायुक्त (प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर हे या समितीचे सदस्य सचिव आहेत.
'टीसीएस'च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या महापालिकेतील नोकरभरतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सरळसेवा भरतीसंदर्भातील इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी निवड समिती गठीत झाली आहे. भरतीप्रक्रियेसाठी अर्ज अंतिम करण्यात आला असून, लवकरच जाहिरात प्रसिध्द होईल.
– लक्ष्मीकांत साताळकर, उपायुक्त (प्रशासन), मनपा
हेही वाचा :