Nashik Drugs : नाशिकमध्ये ‘एमडी’सह दोघे गजाआड | पुढारी

Nashik Drugs : नाशिकमध्ये ‘एमडी’सह दोघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मेफेड्रॉन अर्थात एमडीची पुडी हातात घेऊन तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. त्यातील एकजण टिप्पर गॅंगमधील सदस्य आहे. या दोघांकडून २० ग्रॅम वजनाचा एक लाख रुपयांचा एमडी साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरोधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Nashik Drugs)

निखील बाळू पगारे (२९, रा. पाथर्डी फाटा), कुणाल उर्फ घाऱ्या संभाजी घोडेराव (२२, रा. उत्तमनगर, सिडको) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत. संशयितांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्यात कारमधून प्रवास करताना संशयिताने हातात एमडी पावडरची पुडी घेतलेली होती. याच काळात शहरातील शिंदे गावात एमडीचे दोन कारखाने उघड झालेले, वडाळागावात एमडी विक्रेत्या महिलेसह दाेघांना अटक केलेली तर सामनगाव एमडी प्रकरणातील संशयितांची धरपकड केली होती. त्यानंतरही संशयितांनी व्हिडीओ व्हायरल करीत अप्रत्यक्षरीत्या पोलिसांनाच आवाहन दिले होते. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास केला असता निखील व कुणाल या दोघांना पकडले. दामोदर नगर परिसरात कारवाई करीत त्यांच्याकडून पोलिसांनी २० ग्रॅम एमडीचा साठा जप्त केला आहे. तसेच त्यांच्याविरोधात पोलिस नाईक मिलिंद सिंह परदेशी यांच्या फिर्यादीनुसार एन.डी.पी. एस. कायद्यान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांचाही तपास अंमली पदार्थ विरोधी पथक करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button