नंदुरबार मागास राहिल्याचा ‘फोरम’ने केलेला दावा पालकमंत्री अनिल पाटलांनी खोडला | पुढारी

नंदुरबार मागास राहिल्याचा 'फोरम'ने केलेला दावा पालकमंत्री अनिल पाटलांनी खोडला

नंदुरबार – 75 वर्षांपूर्वीचा नंदुरबार जिल्हा आणि आजचा विद्यमान नंदुरबार जिल्हा यात जमीन आसमानच अंतर आहे. पूर्वीच्या काळात झालेला नव्हता एवढा रस्ते विकास, जल नियोजन, आधुनिक आरोग्य सुविधा हे सर्व केवळ मागील साडेनऊ वर्षात महायुती सरकारच्या माध्यमातून घडले आहे; असे महाराष्ट्राचे पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी स्पष्ट केले.

मागील आठवड्यात डॉक्टर गावित परिवाराच्या विरोधात पर्यायाने भाजपाच्या विरोधात नंदुरबार डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम स्थापन करण्यात आला असून या फोरमच्या व्यासपीठावरील प्रत्येक नेत्याने नंदुरबार जिल्हा अद्यापही मागासलेला आहे त्याचा विकास झालेलाच नाही आदिवासींची फसवणूक झाली; असे आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या व्यासपीठावरून राष्ट्रवादीचे मंत्री अनिल पाटील विकास सांगणारे केलेले जोरदार भाषण फोरमचा दावा खोडणारे ठरले.

14 जानेवारी रोजी नंदुरबार शहरातील शिवाजी नाट्य मंदिरात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे गटाची शिवसेना यासह मित्र पक्षांच्या महायुतीचा मेळावा राज्याचे पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. भंडारा जिल्ह्यातील मेळाव्यामुळे मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित,  गुजरात भागातील अभ्यास दौऱ्यामुळे खासदार डॉक्टर हिना गावित आणि पक्षीय कामामुळे भाजपाचे महामंत्री विजय चौधरी हे मेळाव्याला अनुपस्थित राहिले. विशेष असे की महायुतीचा घटक म्हणून शिंदे गटाच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख एडवोकेट राम रघुवंशी आणि जिल्हा नेते चंद्रकांत रघुवंशी यांचे पत्रिकेवर नाव होते तथापि महायुतीच्या मेळाव्याला ते उपस्थित राहिले नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे गटाची शिवसेना महायुती पासून आली तर हात असल्याचे चित्र नंदुरबार जिल्ह्यात निर्माण झाले.

दरम्यान प्रमुख वक्ते म्हणून मेळाव्याला संबोधित करताना मंत्री अनिल पाटील भाषणात म्हणाले की एकही आजी-माजी आमदार उपस्थित नाही एकही आजी-माजी खासदार उपस्थित नाही; असा हा पहिला मेळावा मी अनुभवतोय परंतु स्वतः खर्च करून प्रत्येक कार्यकर्ता इथे उपस्थित राहिला आणि मेळावा यशस्वी करून दाखवला हे नक्कीच अभिमानास्पद आहे. खासदारकीचा उमेदवार कोण असेल ते माहीत नाही परंतु जो कोणी उमेदवार दिला जाईल त्याला निवडून आणण्यासाठी महायुती मधील आमच्या अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस सह प्रत्येक पक्ष एकत्रित काम करतील. विरोधी विचारांचा व्यक्ती निवडून गेल्यास आपल्याला निधी आणि काम मागण्याचे अधिकार उरत नाही हे लक्षात ठेवून प्रत्येक कार्यकर्त्याने आपसातील मतभेद संपवावे आणि कामाला लागावे असे देखील मंत्री अनिल पाटील म्हणाले. वीस पंचवीस वर्षांपूर्वी अमळनेर अमळनेर मधून नंदुरबार मार्गे सुरतला जायचे म्हटले तर किंवा डोळ्यातून नंदुरबारला यायचे म्हटले तर अनेक तास प्रवास चालायचा तेव्हाचे रस्ते काय होते हे जुन्या लोकांना विचारून पहा आज सर्वत्र रस्ते विकास झालेला पाहायला मिळतो जलनियोजन सिंचन विकास झालेला पाहायला मिळतो. नंदुरबार सारख्या दुर्गम जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालय स्थापन झाले असून आधुनिक आरोग्य सुविधा मिळाले आहेत हा सर्व विकास केवळ महायुती सरकारमुळे झाला असे मंत्री अनिल पाटील म्हणाले. या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना देखील अनिल पाटील यांनी स्पष्ट केले की,  हा जिल्हा मागास राहिला असे म्हणणे चूक आहे 75 वर्षांपूर्वी किंवा 25 वर्षांपूर्वी हा जिल्हा काय होता इथली स्थिती काय होती हे एकदा आठवून पाहावे. मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य राजेंद्र गावित,  जिल्हाध्यक्ष निलेश माळी,  राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजीत मोरे,  रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सविता जयस्वाल आणि अन्य उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button