नंदुरबार : अक्कलकुवात विमल गुटखासह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त | पुढारी

नंदुरबार : अक्कलकुवात विमल गुटखासह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथे गुजरात सीमेलगत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या विमल गुटखा तंबाखूची वाहतूक करणारा आयशर पकडला गेला. दिनांक 14 जानेवारीच्या रात्री व 15 जानेवारीच्या पहाटे दरम्यान झालेल्या या कारवाईत विमल गुटख्यासह जवळपास 40 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

अक्कलकुवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांच्या पथकाने खापर गावाच्या पुढे हॉटेल रामदेव ढाब्याच्या समोर अंकेलश्वर बऱ्हाणपुर रोडवर अचानक संशयित वाहनांची तपासणी केली असता MH- १८ BG- ९८९२ क्रमांकाच्या आयशर गाडीत विमल पान मसाला V- १ तंबाखु विक्री करण्याच्या उद्देशाने भरलेला आढळून आला.

पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत आयशर गाडीसह संपूर्ण माल ताब्यात घेतला. या कारवाईत करण रामभाई जोगराणा वय- २० रा. चोपडा रोड धरणगाव, विजय आमाभाई जोगराणा वय-१८ रा. चोपडा रोड धरणगाव ता. धरणगाव जि. जळगाव या दोन संशयीत्यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत ४८००० रु. किमतीचे V-१ तंबाखुचे १०० लहान खोके, ७ लाख ५२,००० रु. किमतीचे विमल पान मसाल्याचे १०० खोके, ४ लाख ३५ हजार ६०० रु. किमतीचे विमल पान मसाल्याचे २२०० पाऊच, २७ लाख ३० हजार रु. कि. विमल पान मसाल्याचे १८,२०० पाऊच, ५ लाख ४६,०००/- रु. कि. V-१ तंबाखुचे १८२०० लहान पाऊच, ४८४००/- र .कि. V-१ तंबाखुचे २२०० लहान पाऊच, १५,००,०००/- रु. कि. एक आयसर गाडी अशा एकूण जवळपास ४० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Back to top button