Nashik News : पिस्तूल, एके ४७ पाहून भारावले नाशिककर | पुढारी

Nashik News : पिस्तूल, एके ४७ पाहून भारावले नाशिककर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पिस्तूल, एके ४७, बॉम्बशोधक व नाशक साहित्य, जलद प्रतिसाद दलातील वाहन, कमांडो, पोलिसांची कार्यपद्धती जवळून बघण्याचा अनुभव नाशिककरांना मिळाला. पोलिस स्थापना दिनानिमित्त शहर पोलिसांकडून शहरातील सिटी सेंटर मॉल येथे दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनात पोलिस दलातील शस्त्र, यंत्रसामग्री, महत्त्वाची साधने, कमांडो, विविध विभागांची माहिती देणारे स्टॉल लावले होते. त्यामुळे नाशिककरांनी पोलिस दलाची माहिती घेण्यासाठी, प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती.

२ जानेवारीपासून पोलिस रेझिंग सप्ताहांतर्गत शहर पोलिसांनी सिटी सेंटर मॉल येथे दोन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले होते. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या संकल्पेतून आयोजित प्रदर्शनात सर्व शस्त्रे, अद्ययावत वाहने आणि विविध विभागांची माहिती नाशिककरांना देण्यात आली. त्यामध्ये पिस्तूल, एके ४७ व इतर आधुनिक शस्त्रांची मांडणी केली असून, नागरिकांना शस्त्र व पोलिसांच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. वाहतूक शाखेने वाहतूक नियमांबाबत प्रबोधन केले. तर सायबर गुन्हेगारीसंदर्भातही नागरिकांना सतर्क केले. दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथकासह बॉम्बशोधक व नाशक पथकाची माहिती जाणून घेण्यात नागरिकांनी स्वारस्य दाखवल्याचे दिसत होते.

‘सिरेमोनियल परेड’ने सप्ताहाची सांगता

पोलिस कवायत मैदानावर सोमवारी (दि. ८) सकाळी आठ वाजता पोलिस रेझिंग सप्ताहाचा समारोप होईल. त्यानिमित्त ‘सिरेमोनियल परेड’ होणार आहे. या परेडमध्ये सर्व पोलिस ठाणे व विभागांचे अधिकारी-कर्मचारी सहभागी होतील. त्यावेळीही शस्त्रांसह पोलिसांच्या वाहनांचे प्रदर्शन मांडण्यात येईल. परेडला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह विविध शासकीय विभागांतील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा

Back to top button