नंदुरबार क्राईम : पहिल्यांदा गळा दाबला, मृतदेह तलावात, नंतर नदीत फेकला अन्… | पुढारी

नंदुरबार क्राईम : पहिल्यांदा गळा दाबला, मृतदेह तलावात, नंतर नदीत फेकला अन्...

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा

पहिल्यांदा निर्दयपणे गळा घोटला, मग तो मृतदेह तलावात फेकला. पण प्रेत फुगल्यावर गुन्हा उघडकीस येईल, या भीतीने आरोपींनी तलावातून बाहेर काढून पुन्हा तो विहिरीत फेकला. परंतु रात्रीच्या अंधारात घडवलेले ते क्रूर नाट्य स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि तालुका पोलीस ठाण्याच्या चाणाक्ष पोलीस पथकांनी (नंदुरबार क्राईम) अखेरीस उघडकीस आणले.

जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनी वैंदाने येथील खुनाच्या तपासाची माहिती देताना म्हणाले की, “कुठल्याही प्रकारचा पुरावा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तांत्रिक पुरावा, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे नसतांना क्लिष्ट अशा गुन्ह्याची उकल लावण्यात स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील,  अपर पोलीस अधिक्षक विजय पवार, उप विभागीय पोलीस अधीकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक योगेश चौधरी तसेच संपूर्ण स्थानिक गुन्हे शाखा व नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याच्या अमंलदारांनी केली आहे.

दिनांक 14/11/2021 रोजी नंदुरबार तालुक्यातील वैंदाणे ते खोक्रोळे रस्त्या दरम्यान मालपूर फाट्याजवळील वनक्षेत्र परिसरातील एका विहिरीत एक प्रेत तरंगत असलेले नागरिकांना आढळले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक योगेश चौधरी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली असता एका चादरीमध्ये गुंडाळलेले व त्याच चादरीने मानेजवळ व पायाजवळ गाठ मारलेली होती.

तो अनोळखी इसम नग्नावस्थेत होता आणि मयताच्या डोक्यावर डाव्या बाजूस पाटीवर व तोंडावर जखमेच्या खुणा दिसत होत्या. मयताच्या उजव्या हातावर संजय राजेंद्र मोरे असे त्रिशूलमध्ये गोंधळेलेले असल्याने त्याची ओळख निष्पन्न करण्यात आली आणि पोलीस हवालदार ज्ञानेश्वर सदा सामुद्रे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात खूनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला. घटनास्थळावर आरोपी शोधण्यास मदत होऊ शकेल असे कोणत्याही प्रकारचे पुरावे मोबाईल प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तसेच इतर कोणतीही वस्तू मिळुन आलेली नव्हती. त्यामुळे मयताची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर होते. मयताची ओळख पटविण्यात जरी पथकांना यश आले होते, परंतु सदर मयत इसमाचे मारेकरी कोण ? त्यास का मारण्यात आले? मारण्याचा उद्देश काय? असे मोठे प्रश्न पोलिसांपुढे उभे होते. यासाठी वेगवेगळे 8 पथके तयार करून तपासासाठी रवाना करण्यात आले.

दिनांक 18/11/2021 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, घटनास्थळापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतातील रखवालदाराने 7 ते 8दिवसापूर्वी त्याच्या शेतापासून काही अंतरावर त्यास रात्रीच्या वेळी 4 ते 5 लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता. परंतु प्रयत्न करूनही उपयूक्त काहीच माहिती मिळत नव्हती. अशातच दिनांक 19/11/2021 रोजी पुन्हा गोपनीय बातमी मिळाली की, मयताचे शनिमांडळ गावातील काही इसमांशी भांडण झाले होते व त्या वादातुनच त्याचा खुन झाला असावा. ही माहिती मिळाल्याने शनिमांडळ गावातील काही संशयीत इसमांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले.

पोलिसी खाक्या दाखवूून चौकशी (नंदुरबार क्राईम) केली असता त्यांनी सांगितले की, दिनांक 06/11/2021 रोजी मयत संजय राजेंद्र मोरे हा त्यांच्या घरी वाईट उद्देशाने आल्याने त्याचा त्यांना राग होता. त्यामुळे त्यांनी त्याचा शनिमांडळ व नंदुरबार शहरात शोध घेतला परंतु तो भेटला नाही. त्याच दरम्यान तिन्ही संशयीत आरोपींना मयत संजय मोरे हा रनाळा ते घोटाणे रस्त्यावर फाट्याजवळील हॉटेल कर्मभुमी येथे जेवण करुन बाहेर निघतांना दिसला. त्याचा तिन्ही संशयीत आरोपींनी पाठलाग करुन त्यास हॉटेल कर्मभुमीच्या पुढे सुमारे 100 ते 200 मिटर अंतरावर अडवले. त्यांच्याकडे असलेल्या लाकडी डेंगाऱ्याने त्यास मारहाण करुन बेशुद्ध केले. त्यानंतर त्यास शनिमांडळ शिवारात इंद्रीहट्टी रस्त्याला असलेल्या तलावाजवळ नेवून त्याचा गळा आवळून जिवेठार मारले. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कपडे काढून चादरीमध्ये गुंडाळून मयत संजय मोरे यास तलावात फेकून दिले व त्यानंतर तिन्ही संशयीत आरोपी घरी निघून गेले.

परंतु फेकलेला मृतदेह काही वेळाने नैसर्गिकरीत्या पुन्हा पाण्यावर तरंगू शकतो व आपले बंग फुटू शकते, या भितीने मयताचे प्रेत आरोपींनी दोन ते तिन दिवसांनी पुन्हा पाण्यातून बाहेर काढले. ते वैंदाणे येथील शेत शिवारात राखीव वनक्षेत्रातील पुरातन विहिरीत चादरमध्ये गुंडाळुन फेकून दिल्याची कबुली दिली. म्हणून संजय रामभाऊ पाटील (वय 52), शुभम संजय पाटील (वय-21), रोहित सुखदेव माळी (वय-23) तिन्ही रा. शनिमांडळ ता. जि. नंदुरबार यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच सदर गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मा.पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील (नंदुरबार क्राईम) असे यांनी सांगितले.

Back to top button