

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नायलॉन मांजा विक्री आणि वापरावर बंदी असतानाही त्याची विक्री करणाऱ्या युवकांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल ३३ हजार सहाशे रुपये किंमतीचा मांजा हस्तगत केला असून, म्हसरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युनिट क्र. १ चे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मखमलाबाद येतील स्वामी विवेकानंद नगर येथे दोन इसम बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्री करीत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यांनी तत्काळ ही बाब वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय ढमाळ यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस अंमलदार मिलिंदसिंग परदेशी, राजेश राठोड, राहुल पारखेडे, मुक्तार शेख, अमोल कोष्टी यांनी सापळा रचला. त्यामध्ये विकास शिवसिंग देवरे (२७, रा. मखमलबाद) व अभिषेक सोपान भंडागे (२१) हे दोघे आढळून आले असून, त्यांच्याकडून दोन प्लॅस्टिकच्या गोण्यामध्ये ४३ नग मोनोकाइट कंपनीचे नायलॉन मांजाचे गट्टू आढळून आले. या मांजाची किंमत ३३ हजार सहाशे रुपये सतकी असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करू नये, असे आवाहन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.
हेही वाचा :