Nashik Citylink : भाडेवाढीसाठी सिटीलिंकची धडपड, शासनाला प्रस्ताव सादर

Nashik Citylink : भाडेवाढीसाठी सिटीलिंकची धडपड, शासनाला प्रस्ताव सादर

नाशिक : पुढारी वत्तसेवा; वाढता तोटा कमी करण्यासाठी प्रवासी तिकीट दरात वाढ करण्याकरीता 'सिटीलिंक'ची गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली धडपड आता शासनाच्या दारी पोहोचली आहे. सिटीलिंकच्या काही मार्गांवरील बस प्रवासी तिकीट दर यापूर्वीच शासनाने निर्धारीत केलेल्या बसभाडे मूल्य दरसूचीच्या कमाल मर्यादेपर्यंत पाहोचल्याने नवीन वर्षातील प्रस्तावित दरवाढ अडचणीत सापडली आहे. त्यामुळे भाडेदराची कमाल मर्यादा वाढवून देण्याची विनंती सिटीलिंकने शासनाच्या गृह व परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांकडे केली आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून नाशिक महापालिकेने ८ जुलै २०२१ पासून शहर बससेवेचे संचलन हाती घेतले. सद्यस्थितीत २०० सीएनजी तर ५० डिझेल इंधनावरील अशा एकूण २५० बसेस शहर व लगतच्या ग्रामीण भागात सिटीलिंकच्या माध्यमातून चालविल्या जात आहेत. या बससेवेतून सिटीलिंकला पर्यायाने महापालिकेला कोट्यवधीचा तोटा सहन करावा लागत असला तरी, नाशिककरांच्या दृष्टीने सिटीलिंकची बससेवा अत्यंत उपयुक्त ठरली आहे. सिटीलिंकने केलेल्या ठरावानुसार दरवर्षी जानेवारी महिन्यात किमान पाच टक्के भाडेवाढीची मुभा आहे. त्यानुसार सुरूवातीला जानेवारी २०२२ मध्ये पाच टक्के तर, जानेवारी २०२३ मध्ये सुमारे दहा टक्क्यांपर्यंत प्रवासी तिकीट भाडेदरवाढ करण्यात करण्यात आली आहे. आता जानेवारी २०२४ मध्ये किमान पाच टक्के भाडेवाढ अपेक्षित होती. मात्र शासनाच्या बस प्रवासी भाडेमूल्य दरसूचीमुळे सिटीलिंकची अडचण झाली आहे. या दरसूचीनुसार शासनाच्या परिवहन विभागाने बससेवेच्या प्रत्येक टप्प्यांकरीता किमान व कमाल दर निश्चित केले आहेत. या दरसूचीनुसार सिटीलिंकचे प्रवासी बस तिकीट भाडेदर हे काही टप्प्यांवर कमाल दराच्या जवळपास पोहोचले आहेत. शासनाच्या या दरसूचीपेक्षा अधिक दर वाढ करणे कायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे सिटीलिंकची कोंडी झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी सिटीलिंकने गृह व परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांना प्रस्ताव पाठवित भाडेदराची कमाल मर्यादा वाढविण्याची मागणी केली आहे.

..तर संपूर्ण राज्यात दरवाढ!

बस तिकीटदरासाठी शासनाच्या परिवहन खात्याने किमान व कमाल दराची सूची निश्चित केली आहे. त्यानुसारच राज्यातील सर्व महापालिका तसेच परिवहन महामंडळाच्या बसेसचे तिकीट दर निश्चित केले जात असतात. सिटीलिंकच्या मागणीनुसार तिकीट दराचे कमाल दर वाढविण्याची मागणी मान्य केल्यास संपूर्ण राज्यासाठी नवीन दरवाढ लागू करावी लागेल. त्यामुळे संपूर्ण राज्यातील बससेवा महागण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ करणे शासनाला परवडणारे नाही. त्यामुळे सिटीलिंकची भाडेवाढ तूर्ततरी अशक्य असल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news