Nashik News : ओटीटी वरील व्हिडिओ चोरला, युवा अभियंत्यावर गुन्हा  | पुढारी

Nashik News : ओटीटी वरील व्हिडिओ चोरला, युवा अभियंत्यावर गुन्हा 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नामांकित ‘ओटीटी’ प्लॅटफॉर्मसह ॲपवरील व्हिडिओ व मजकूर विनापरवानगी वापरुन एकाने स्वत:च्या ॲपवर अपलोड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शहरातील एका २१ वर्षीय अभियंत्याविरोधात संबंधित ओटीटी कंपनीच्या प्रतिनिधीने सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सायबर पोलिस तपास करीत आहेत.

शहरातील एका अभियंत्याने स्वत:चे ‘फायर व्हिडीओ’ हे ॲप तयार केले. या ॲपवर त्याने नामांकित ओटीटी प्लॅटफॉर्म व इतर ॲपवरील व्हिडीओ कंटेट अपलोड करून तो दर्शकांसाठी कमी किंमतीत उपलब्ध करून दिला. या अभियंत्याचा हा प्रकार आंतरराष्ट्रीय ओटीटी प्लॅटफॉर्म व ॲप असणाऱ्या कंपनीच्या ‘पायरसी इन्व्हेस्टीगेटर’ अधिकाऱ्याने उघड केला. त्यानंतर या अधिकाऱ्याने नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेत तक्रार अर्ज दाखल केला होता.

गुन्हे पोलिस उपायुक्तांच्या पथकामार्फत या अर्जाची तपासणी करण्यात आली. त्यानुसार सिडकोत राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणाविरोधात सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियमासह कॉपीराइट अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रियाज शेख पुढील तपास करीत आहेत.

ॲप विकसीत करून कमाई

संशयित तरुण हा सिडको परिसरातील रहिवाशी आहे. त्याने कॉम्प्युटर इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले असून काही महिन्यांपूर्वी त्याने ‘फायर व्हिडिओ’ हे ॲप तयार केले. या ॲपवर एका ओटीटी प्लॅटफॉर्म व ॲपवरील कंटेट अपलोड करुन विनापरवानगी प्रसारित केला. संशयिताने स्वत:च्या ॲपवर सबस्क्राइबर्सही वाढवले. नाशिकसह देशातले व परदेशातल्या युजर्सनेही संशयिताच्या ॲपचे सबस्क्रिप्शन घेतल्याचे समोर आले. ओटीटी कंपनीच्या पॅकेजपेक्षाही कमी किंमतीत संशयिताने तोच कंन्टेट उपलब्ध करुन दिल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे ॲपच्या माध्यमातून पैसे कमावल्याचे चौकशीतून समोर येत आहे.

हेही वाचा :

Back to top button