नाशिक जिल्ह्यातील ३६,९२३ विद्यार्थी आधारकार्डविना | पुढारी

नाशिक जिल्ह्यातील ३६,९२३ विद्यार्थी आधारकार्डविना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; पालकांची उदासीनता आणि तांत्रिक अडचणींमुळे जिल्ह्यातील ३६ हजार ९२३ विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच २३ हजार ३०८ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध ठरविण्यात आले आहेत, तर १६ हजार ४८८ विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची प्रक्रिया अपूर्ण असल्याची बाब उघडकीस आली आहे.

विद्यार्थ्यांकडे आधारकार्ड नसल्याने शाळांच्या संचमान्यतेला ब्रेक लागला असून, आधारकार्ड नसल्याने हे विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शासकीय व खासगी अनुदानित शाळांत प्रवेशित विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजन, शिष्यवृत्तीसाठी, मोफत पुस्तके-गणवेश मिळवण्यासाठी सरल प्रणालीत आधारकार्ड नोंदणी सक्तीची आहे. सरकारी योजना, शैक्षणिक योजना, शाळांच्या संचमान्यता, पटसंख्येसाठी ‘आधार’ ग्राह्य धरण्यात येते. त्यामुळे शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांचे ‘आधार’ तयार करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात दाेन याप्रमाणे ३० आधारकार्ड मशीन दिले आहेत. मात्र, पालकांच्या उदासीनतेमुळे आधारकार्ड माेहिमेला अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात १२ लाख ९८ हजार १८० विद्यार्थी विविध शासकीय, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांत शिक्षण घेत आहेत. त्यापैकी १२ लाख २१ हजार ४५१ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड वैध, तर २३ हजार ३०८ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध आहे. १६ हजार ४८८ विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची प्रक्रिया पूर्ण हाेऊ शकली नाही. यामध्ये स्वयंअर्थसहाय्यित शाळांच्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. प्राथमिक शाळांच्या इयत्ता पहिली किंवा दुसरीच्या अनेक विद्यार्थ्यांच्या बोटांचे ठसेच नोंदविले जात नसल्याचे त्यांचे आधारकार्ड तयार हाेण्यास अडचण येत आहे. तसेच परप्रांतीय विद्यार्थ्यांच्या जन्मदाखल्यासह इतर कागदपत्रे उपलब्ध हाेत नसल्याने त्यांच्या आधारकार्डचा प्रश्न निर्माण हाेताे. तर नाव दुरुस्तीनंतर अनेक विद्यार्थ्यांचे ‘आधारकार्ड मिसमॅच’ दिसून येत आहे. दरम्यान, प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या व आधारकार्ड उपलब्ध असणारे विद्यार्थी संख्या लक्षात घेता व आधारकार्डवरील माहिती न जुळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण माेठे आहे. सरासरी ३० विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक असे सध्याचे प्रमाण आहे.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची स्थिती

तालुका वैध आधार आधार नसलेले विद्यार्थी
चांदवड 44,036 394
इगतपुरी 49,427 690
त्र्यंबकेश्वर 37,494 809
पेठ 26,385 471
निफाड 95,214 1,503
सिन्नर 66,939 1,495
सुरगाणा 35,895 816
नाशिक 57,141 1,283
बागलाण 77,345 1,756
नांदगाव 55,693 1,523
येवला 53,712 1,658
दिंडोरी 66,609 1,538
नाशिक युआरसी (१) 149,063 5,208
कळवण 39,907 1,223
देवळा 29,708 803
नाशिक युआरसी (२) 131,117 4,954
मालेगाव 83,206 3,125
मालेगाव मनपा 122,570 7,674

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आधारकार्ड तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. जवळपास ९५ टक्के विद्यार्थ्यांचे आधारकार्ड आहेत तसेच प्रत्येक तालुक्याला आधार कीट दिले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचे आधारकार्डही लवकरच काढण्यात येतील. त्यासाठी शैक्षणिक संस्थांची मदत घेण्यात येणार आहे.

-नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

हेही वाचा :

Back to top button