ओझरला आजपासून खंडेराय महाराज यात्राेत्सव

ओझरला आजपासून खंडेराय महाराज यात्राेत्सव
Published on
Updated on

ओझर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा – येथील ग्रामदैवत खंडेराय महाराज यात्रोत्सवाला आज (दि. १८) प्रारंभ होत आहे. पूर्वी दोन दिवस भरणारी ही यात्रा आता १८ ते २१ डिसेंबर अशी चार दिवस चालणार आहे. दि. १८ डिसेंबरला चंपाषष्ठीच्या दिवशी बारागाडयांचा कार्यक्रम हाेणार आहे.

बाणगंगा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर पुरातन खंडेराय मंदिर असून, मुंबई-आग्रा महामार्गाच्या पश्चिमेस नवीन खंडेराव मंदिर बांधलेले आहे. पहिल्या दिवशी विश्वस्तांच्या घरातील कुटुंबप्रमुख घटस्थापना करतात. त्यानंतर षष्ठीपर्यंत 'श्री मल्हार माहात्म्य' या ग्रंथाचे पारायण होते. दररोज चढत्या क्रमाने मूर्तीवर पुष्पमाला चढवण्यात येते. चंपाषष्ठीच्या दिवशी पारायणाच्या व्रताची सांगता होऊन पहाटे पुजारी व मान्यवरांकडून महापूजा करण्यात येईल. त्यानंतर दर्शनासाठी भाविकांची रांग लावण्यात येईल. पहिल्या दिवशी भंडारा उधळला जाईल. बाणगंगा नदीचे दर्शन करून अश्व मंदिराकडे नेला जाईल. खंडेराय महाराजांचा जयघोष करत (कै.) विष्णुपंत पगारांचा मानाचा मोंढा गाडा, सोनेवाडी, शेजवळवाडी, वरचा माळीवाडा, मधला माळीवाडा, सिन्नरकर-निंबाळकर-चौधरी, पगार- गवळी, रासकर, भडके, कदम व इतर बारा बलुतेदार शिंदे-चौधरी- घोलप- शिवले व अण्णा भडके यांची बैलगाडी, मल्हाररथ असा अश्वांच्या मदतीने बारागाड्यांना देवाचा हा 'वारू' जोडला जाईल आणि गोरज मुहूर्तावर हे बारागाडे ओढून यात्रेला सुरुवात होईल. हा थरार अनुभवण्यासाठी परिसरातील हजारो आबालवृद्ध भाविक गर्दी करतात.

ओझर येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रोत्सवाची रूपरेषा 

१८ डिसेंबर- बारागाडे ओढण्याचा कार्यक्रम व यात्राेत्सव प्रारंभ

१९ डिसेंबर – मंदिर परिसरात लावण्या हजेरी, सायंकाळी कुस्ती दंगल

२० डिसेंबर – सायंकाळी बैलगाडा शर्यत

तरुणाईचा स्वयंस्फूर्तीने सहभाग

यंदाच्या यात्राेत्सवात ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांनीही स्वयंस्फूर्तने सहभागी होत यात्रा कमिटीत आपल्या कामाचा ठसा उमटवला

यात्राेत्सव कमिटीत अध्यक्ष: परशराम खंडेराव शेलार, उपाध्यक्ष: प्रशांत चौरे, नवनाथ चौधरी, सतीश पगार, युवराज शेळके, कार्याध्यक्ष: रामू पाटील, खजिनदार : शिवा शेजवळ, सहखजिनदार: दत्तू घोलप, संघटक: सचिन शिवले, सहसंघटक: संजय शिंदे आदींचा समावेश आहे.

नगर परिषद, पोलिस प्रशासन सज्ज..

जेजुरीनंतरचा सर्वात मोठा यात्राेत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या यात्राेत्सवास ओझर नगर परिषद व पोलिस प्रशासन सज्ज असून नगर परिषदेच्या वतीने यात्राेत्सवास सर्वतोपरी मदत करणार असून महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणार असून बारागाडा मार्गावरील रस्त्यांची डागडुजी करण्यात आली असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख यांनी दिली, तर पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त राहणार आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news