NAMCO Bank Election : नामको संचालकांविरोधातील याचिका फेटाळली, निवडणूकीचा मार्ग मोकळा | पुढारी

NAMCO Bank Election : नामको संचालकांविरोधातील याचिका फेटाळली, निवडणूकीचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नामको बँकेच्या विद्यमान संचालकांच्या उमेदवारीविरोधात दाखल केलेल्या याचिकेमुळे निवडणुकीत काहीसा अडसर निर्माण झाला होता. मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळल्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, सत्ताधारी प्रगती पॅनलने प्रचाराचा धुरळा उडवला असून, जिल्हाभरातील सभासदांच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर लक्ष केंद्रित केले आहे. (NAMCO Bank Election)

नामको बँक संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी निवडणूक होत आहे. यात महिला राखीवच्या दोन जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १९ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात आहे. दरम्यान, साखर घोटाळ्यात उच्च न्यायालयाने दोषी ठरवलेले व रिझर्व बँकेने पारित केलेल्या आदेशानुसार विद्यमान संचालकांचे अर्ज अपात्र ठरवत त्यांना उमेदवारी देवू नये, यासाठी संदीप भवर यांनी याचिका दाखल केली होती. यावर गेल्या तीन दिवसांपासून सुनावणी सुरू होती. बुधवारी (दि.१३) न्यायालयाने ती फेटाळल्याने, विद्यमान संचालकांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मंगळवारी प्रगती पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर बुधवारी पॅनलच्या उमेदवारांनी ठीकठिकाणी प्रचार रॅली काढत सभासदांचे लक्ष वेधले. (NAMCO Bank Election)

निवडणूक १२ दिवस राहिल्याने, न्यायालयाने याचिका फेटाळली आहे. मात्र, निवडणूक संपताच पुन्हा फेरयाचिका दाखल करणार आहे. यावेळी भारतीय रिझर्व्ह बँकेलाही यात पार्टी करणार आहे.

– संदीप भवर, याचिकाकर्ते

अपक्षांचा ‘एकला चलो’ चा नारा

सत्ताधारी प्रगती पॅनलला टक्कर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या सात अपक्षांनी एकला चलोचा नारा देत प्रचाराला सुरुवात केली आहे. प्रतिस्पर्धी सहकार पॅनलच्या उमेदवारांनी माघार घेतली असली तरी, अपक्ष संदीप भवर हे सहकार पॅनलच्या माध्यमातूनच मतदारांना साद घालत आहेत. अन्य मतदारांकडून देखील सभासदांना सपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. (NAMCO Bank Election)

हेही वाचा :

Back to top button