Nashik News : लोकसभेसाठी महायुतीचा ४५ प्लस’चा नारा; नाशिक, दिंडोरीची जागा निवडून आणण्याचा संकल्प | पुढारी

Nashik News : लोकसभेसाठी महायुतीचा ४५ प्लस'चा नारा; नाशिक, दिंडोरीची जागा निवडून आणण्याचा संकल्प

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ निवडणुकीत घवघवीत यश मिळवित भाजपने लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल जिंकल्यानंतर भाजप, शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीने विरोधकांना एकीची वज्रमूठ दाखवत राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४५ हून अधिक जागांवर विजय मिळविण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पपूर्तीसाठी जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये विरोधकांना धूळ चारण्यासाठी एकजुटीने, एकदिलाने काम करण्याच्या आणाभाका जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आल्या.

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीने दंड थोपटले आहेत. या निवडणुकीच्या पूर्वतयारीचा एक भाग म्हणून महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक रविवारी (दि.१०) हॉटेल एक्सप्रेस इन येथे पार पडली. राज्यातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्यासाठी महायुतीने ‘मिशन ४८’ हाती घेतले आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक व दिंडारी लोकसभा मतदारसंघाच्या जागेवर विजय मिळविण्यासाठी राजकीय व्यूव्हरचनेवर या बैठकीत चर्चा झाली. याप्रसंगी शिवसेने(शिंदे गटा)चे सचिव तथा उत्तर महाराष्ट्र संपर्कनेते भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, भाजप आमदार ॲड. राहुल ढिकले, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाजपचे ज्येष्ठ नेते विजय साने, बाळासाहेब सानप, गिरीश पालवे, राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार गटा)चे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदींनी मनोगत व्यक्त केले. या बैठकीस शिवसेना(शिंदे गट) संपर्क प्रमुख जयंत साठे, सह संपर्कप्रमुख राजू लवटे, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, धनराज महाले, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, महानगर प्रमुख प्रविण तिदमे, गणेश कदम, सुवर्णा मटाले, भाजप जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लक्ष्मण सावजी, केदा आहेर, नाना शिलेदर, राष्ट्रवादीचे नाना महाले, योगेश निसाळ, प्रेरणा बलकवडे, राजेंद्र सोनवणे, भूषण कासलीवाल, रघुनाथ पवार, गोरख बोडके, डॉ. योगेश गोसावी, योगेश खैरनार, विलास सानप, अनिल काळे, प्रकाश जाधव, शरद कासार, सुनील केदार, चेतन कासव, विनोद शेलार, योगिता आहेर, योगेश बेलदार, अमोल सूर्यवंशी, रुपेश पालकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महायुतीचा लवकरच मेळावा

शिवसेना(शिंदे गट) जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी प्रास्तविकात आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी महायुतीची व्यूव्हरचना मांडत आगामी काळातील उपक्रमांविषयी माहिती दिली. महायुतीची ही राज्यातील पहिलीच बैठक होत असल्याने वरिष्ठ नेते पदाधिकाऱ्यांबरोबरच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी देखील एकजुटीने काम करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्याची सूचनाही बोरस्ते यांनी मांडली.

निवडणुकांसाठी समन्वय समिती

केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या सर्व सरकारी योजना तळागाळा पर्यंत पोहचवणे, आगामी निवडणुकींच्या माध्यमातून सर्वसमावेश कार्यक्रमांचे नियोजन करणे, सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधणे, महायुतीचा पदाधिकारी-कार्यकर्ता मेळावा आयोजित करणे, एकजुट, एकदिलाने काम करणे, प्रलंबित कामांचा संयुक्तपणे पाठपुरावा करणे, झालेल्या कामांचे लोकार्पण करणे आदी सूचना या बैठकीत देण्यात आल्या. आगामी निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा, विधानसभानिहाय जिल्हा समन्वय समिती स्थापन करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button