Drug Case : ललित पाटीलचा भाऊ भूषण व साथीदार अभिषेकचा नाशिक पोलिस घेणार ताबा

Drug Case : ललित पाटीलचा भाऊ भूषण व साथीदार अभिषेकचा नाशिक पोलिस घेणार ताबा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ड्रग्ज माफिया ललित पानपाटील याचा भाऊ भूषण पानपाटील व साथीदार अभिषेक बलकडे या दोघांचा ताबा नाशिक पोलिस घेणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या शिंदे गावातील एमडी गोदाम प्रकरणी चौकशी सुरू होणार आहे. या दोघांना ताब्यात घेण्यासाठी नाशिक अमली पदार्थ विरोधी पथक (एनडीपीएस) मंगळवारी (दि. ५) पुण्यात दाखल झाले. तेथील 'ट्रान्झिट रिमांड'ची प्रक्रिया पूर्ण केल्यावर दोन्ही संशयितांना नाशिकमध्ये चौकशीसाठी आणणार आहेत. (Drug Case)

ऑक्टोबर महिन्यात मुंबई व नाशिकरोड पोलिसांनी शिंदे गावात छापा टाकून एमडीचा कारखाना व गोदाम उघडकीस आणले. सखोल चौकशीत कारखाना व गोदामाचे व्यवहार ललितचा भाऊ भूषण पानपाटील याच्यामार्फत होत असल्याचे उघड झाले. दरम्यान, मुंबई पोलिसांकडून ताबा घेतलेल्या संशयित शिवा अंबादास शिंदे यानेदेखील नाशिक पोलिसांना चौकशीत माहिती दिली. त्यामुळे मुंबई-पुणे पोलिसांच्या तपासानंतर भूषण व अभिषेकचा नाशिक पोलिस ताबा घेत आहे. दोघांच्या चौकशीतून एमडी कारखाना कसा, केव्हा सुरू केला, गोदामाबाबतची माहिती, किती प्रमाणात एमडी तयार केले, एमडी विक्रीतून आलेल्या पैशांचे व्यवहार व गुंतवणूक तसेच एमडीचा पुरवठा कुठे व कोणामार्फत केला, याचा तपास शहर पोलिस करणार आहेत. 

कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

६ ऑक्टोबरला रात्री नाशिकरोड व गुन्हे शोध पोलिसांनी शिंदे गावातल्या एका गोदामात धाड टाकून चार किलो ८०० ग्रॅम एमडीसह इतर रसायन असा पाच कोटी ९४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. या गुन्ह्यातील संशयित मुंबई व पुणे पोलिसांच्या ताब्यात आहेत. संशयित शिवा हा एमडीसाठी लागणारे रसायन (कच्चा माल) पुरविण्याचे काम करायचा. तो नाशिकमध्ये भिवंडी आणि नवी मुंबईतून सर्व माल आणायचा, असे पोलिस तपासात उघड झाले.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news