

सिडको : पुढारी वृत्तसेवा- सिडकोतील तोरणा नगर परिसरातील उर्दू हायस्कूलच्या मागे असलेल्या चौथ्या स्कीम मधील एका घराला शनिवारी दुपारी १२ वाजून १२ मिनिटांनी आग लागल्याने घरातील संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. सुदैवाने घरातील मंडळी बाहेर असल्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.
घरामध्ये पती-पत्नी, आई व दोन मुले असा परिवार आहे. घरातील मंडळी भाजी घेण्यासाठी बाहेर पडले होते. खबर कळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. परंतु गल्लीबोळातून घटनास्थळी पोहोचण्यास नेहमीप्रमाणे अडचण निर्माण झाली. अवघ्या पंधरा मिनिटात अग्निशमनदलाने येथील आग विझवून आटोक्यात आणली. या पूर्वी विद्युत विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी घरातील विज पुरवठा बंद केला. या आगीत घरातील टीव्ही, फर्निचर, कपाट गादी आदी साहित्य जळून भस्मसात झाले व लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
यावेळी सिडको अग्निशमन दलाचे लीडिंग फायरमन ए.ए. पटेल, वाहन चालक मल्हारी अहिरे, एम. पी. भालेराव, आम्ले, वझरे, जोशी, शिलावट आदी कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी मेहनत घेतली. घटनास्थळी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .