Dhule Crime : धक्कादायक! दरोडेखोरांकडून तरुणीचे अपहरण बनावच असल्याचे उघड | पुढारी

Dhule Crime : धक्कादायक! दरोडेखोरांकडून तरुणीचे अपहरण बनावच असल्याचे उघड

धुळे : पुढारी वृत्तसेवा; साक्रीतील सरस्वती नगरात सशस्त्र दरोडा प्रकरणात तरुणीचे अपहरण केल्याचा बनाव असल्याची बाब पोलीस तपासात उघडकीस आली आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. तरुणीचा अपहरण केल्याचा बनाव असल्याच्या माहितीला पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दुजोरा दिला आहे.

दहिवेल रस्त्यालगत विमलबाई पाटील महाविद्यालयाच्या पाठीमागे राहणाऱ्या ज्योत्स्ना पाटील यांच्या घरी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास चार ते पाच अज्ञात दरोडेखोर घरात शिरले. ज्योस्ना पाटील यांचे पती नीलेश पाटील काही कामानिमित बाहेरगावी गेले असल्याने त्यांनी त्यांच्यासोबत साक्रीतच राहणारी त्यांची भाची निशा मोठाभाऊ शेवाळे हिला सोबत बोलावले होते. दरोडेखोरांनी घरात प्रवेश केल्यानंतर झटापट करत,तोंड हाताने दाबत तसेच त्यांच्याकडील लहान बंदूक व अन्य धारधार शस्त्रचा धाक दाखवत अंगावरील एकूण 88 हजार पाचशे रुपये किमतीचे दागिने हिसकावून घेतल्याचे ज्योत्स्ना पाटील यांनी पोलिसांनी सांगितले. त्यानुसार साक्री पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

विशेषता दरोडेखोरांनी निशा शेवाळे या तरुणीचे अपहरण केल्याची तक्रार झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली. त्यामुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी तपासाची सूत्रे फिरवली. दरम्यान संबंधित तरुणी ही मध्य प्रदेशातील सेंधवा परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने सांगवी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे यांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. दरोडा आणि अपहरण प्रकरणात प्राथमिक तपास केला असता यात अपहरणाच्या  प्रकरणात पोलिसांसमोर आलेली माहिती संशयास्पद असल्याचे दिसून आल्याने त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केला. यात अपहरण करणारे दरोडेखोरांपैकी काहींची या तरुणी समवेत ओळख असल्याची बाब निदर्शनास आली. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. या दोघांची सखोल चौकशी केली असता अपहरणाचा प्रकार हा बनाव असल्याचे निदर्शनास आले आहे. आता पोलिसांनी दरोडेच्या गुन्ह्याची माहिती देखील या दोघांकडून घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्या अन्य चौघांचा शोध देखील सुरू केला आहे .संबंधित तरुणीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृतीत सुधार झाल्यानंतर या गुन्ह्यातील आणखी माहिती पुढे येण्यास मदत होणार आहे.

हेही वाचा :

Back to top button