

पिंपळनेर, ता.साक्री : तालुक्यातील पिंपळनेर आणि परिसरात आज सकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर साक्री शहरातही पाऊस आणि गारपीट झाली.
पिंपळनेर आणि परिसरातील पश्चिम पट्ट्यात आकाशात अचानक ढग भरून आले. त्यानंतर वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. सोयाबीन, मका, तांदूळ, नागली, मसूर, भगर या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतावर उघडे पडलेल्या पिकांचे या पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. तर गुरांसाठी असलेला चाराही ओला झाला आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांची गरी, गंजी ताडपत्रीने झाकण्यासाठी एकच धावपळ उडाली. तर जेबापूर येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे संपूर्ण पत्रे उडून गेले. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्यामुळे जीवितहानी टळली.
पिंपळनेरसह चिकसे, सामोडे, देगावे, देशशिरवाडे, बल्हाणे, शेवगे, विरखेल, वार्सा, कुडाशी, पानखेडा, नवापाडा, जेबापूर या गावांना पाऊस झाला. साक्री शहरातही पावसासह गारपीट झाली. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.