Tulsi Vivah 2023 : तिन्ही सांजेच्या मुहूर्तावर लागणार तुळशीचे लग्न | पुढारी

Tulsi Vivah 2023 : तिन्ही सांजेच्या मुहूर्तावर लागणार तुळशीचे लग्न

अंबादास बेनुस्कर, पिंपळनेर

दीपोत्सव पर्वाच्या अखेरच्या टप्याला कार्तिकी एकादशीपासून प्रारंभ होत आहे. कार्तिकी एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी तुळशी विवाह (Tulsi Vivah 2023) साजरा करतात. आज ता. 24 नोव्हेंबरपासून तुळशी विवाहाला प्रारंभ होणार आहे. यंदा 27 नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाहाचे मुहूर्त आहेत. धार्मिक मान्यतांनुसार भगवान विष्णू चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर कार्तिकी एकादशीला निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतात आणि शुभकार्य, लग्नसमारंभांना सुरुवात केली जाते. कार्तिकी द्वादशी ते पौर्णिमेच्या दिवसापर्यंत तिन्ही सांजेच्या मुहूर्तावर तुळशीचे लग्न लावले जाते. तुळशीचे लग्न लावणाऱ्याला कन्यादानाचे पुण्य लाभते, तसेच घरच्या कन्येला श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळतो अशी धारणा आहे.

तुळशी विवाहाची पूजा पद्धत (Tulsi Vivah 2023)

तुळशी विवाहासाठी पाटावर आसन टाकून तुळस आणि शाळीग्राम मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. पाटाभोवती ऊस किंवा केळीच्या पानांचा मंडप सजवून कलश ठेवला जातो. सर्वप्रथम कलश आणि गौरी गणेशाची पूजा करावी. त्यानंतर माता तुळशीला आणि भगवान शालिग्रामला धूप, दिवा, वस्त्र, माळा, फुले अर्पण करावे. तुळशीला शृंगार आणि लाल ओढणी अर्पण केली जाते. असे केल्याने सुखी  वैवाहिक जिवनाचा आशीर्वाद मिळतो. त्यानंतर तुलसी मंगलाष्टक पठण झाल्यावर भगवान विष्णू आणि तुळशीची आरती केली जाते.

27 नोव्हेंबरपर्यंत मुहूर्त (Tulsi Vivah 2023)

कार्तिक शुक्ल द्वादशीपासून तुळशी विवाह सुरु होतात. त्यानुसार आज ता. 24नोव्हेंबर पासून या तुळशी विवाहाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून 27 नोव्हेंबरपर्यंत म्हणजेच कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे तुळशी विवाह साजरे केले जाईल. यंदा 27 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी संपणार आहे. यंदा 27 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा असून, त्यानंतर लग्नसराईला सुरुवात होणार आहे. त्यामुळे वधू-वर पालकांची आतापासून धावपळ सुरु झाली आहे.

Back to top button