Nashik Krishithon 2023 | शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा स्वीकार करावा : पालकमंत्री दादा भुसे

Nashik Krishithon 2023 | शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचा स्वीकार करावा : पालकमंत्री दादा भुसे
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; जगाच्या पाठीवर कृषी क्षेत्रात जे नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, त्याचा स्वीकार आधुनिक शेतीसाठी व्हावा. कृषी क्षेत्रात मूल्यवर्धन करणे गरजेचे आहे. आज मोठ्या प्रमाणात पीकपद्धती बदलत आहे. वातावरणातील बदल, अवकाळी, गारपीट आदी संकटावर मात करून शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. त्यासाठी कृषीथॉन प्रदर्शन महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे यांनी केले. (Nashik Krishithon 2023)

ठक्कर डोम येथे आयोजित कृषीथॉन प्रदर्शन उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सीमा हिरे, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, देवीदास पिंगळे, माजी आमदार दिलीप वाघ, पंजाब नॅशनल बँकेचे महाप्रबंधक नवीन बुंदेला, नाडाचे उपाध्यक्ष अरुण मुळाणे, बार कौन्सिलचे सदस्य जयंत जायभावे, नरेंद्र ठक्कर, अजय बोरस्ते, रंजन ठाकरे, विश्वास नागरे, केतन शाह, चंद्रकांत ठक्कर, जगदीश होळकर उपस्थित होते. भुसे म्हणाले की, महाराष्ट्रात ७० टक्के क्षेत्रावर कापूस, सोयाबीन पीक घेतले जाते. या क्षेत्रात काम करण्याची गरज आहे. केंद्र शासनाच्या माध्यमातून पी. एम. किसान, नमो शेतकरी, एक रुपयात पीकविमा अशा अनेक योजना आहेत. त्याचा लाभ घेण्याची गरज असल्याचे सांगताना गेल्या २५ वर्षांपासून कृषीथॉनचे आयोजन करणाऱ्या न्याहारकर कुटुंबीयांचे त्यांनी कौतुक केले. (iNashik Krishithon 2023)

यावेळी कृषीथॉन विशेष सन्मान प्राप्त करणाऱ्या पुरस्कारार्थींचा गौरव झाला. यामध्ये आदर्श कृषी अधिकारी विवेक सोनावणे, आदर्श मिलेट प्रक्रिया उद्योजक महेंद्र छोरीया, आदर्श कृषी उद्योजक मधुकर गवळी, कृषी महर्षी डॉ. सतीश भोंडे, कृषी महर्षी कृष्णा भामरे, आदर्श कृषी शिक्षण विस्तार कार्य के. के. वाघ कृषी महाविद्यालय यांचा समावेश आहे. कृषीथॉनच्या १६ व्या आवृत्तीत तीनशेहून अधिक कंपन्या सहभागी झाल्या आहेत. ड्रोन, विविध अॅप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसह कृषी निविष्ठा संस्था, कंपन्यांनी घेतलेला सहभाग, कृषी उत्पादनाचे मूल्यवर्धन, कृषी पर्यटन विषयावरचे चर्चासत्र हे यंदाच्या कृषीथॉनचे वैशिष्ट्य आहे. बदलत्या प्रवाहात शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या उद्देशाने कृषीथॉन प्रदर्शनाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचा प्रयत्न अखंडपणे होत आहे. कृषी तंत्रज्ञानाचा प्रचार-प्रसाराचा हा वसा सार्थ ठरवत कृषी क्षेत्राचे उत्पादन वाढावे, आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी विविध उपक्रम आयोजित केले आहेत. (Nashik Krishithon 2023)

संजय न्याहारकर यांनी स्वागत केले. साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविक, हर्षल पाटील यांनी सूत्रसंचालन, तर अश्विनी न्याहारकर यांनी आभार मानले.

वाइनचे नामकरण 'द्राक्षासव' व्हावे

द्राक्ष, जांभूळ व इतर फळांवर प्रक्रिया करून त्यापासून वाइनची निर्मितीचा प्रयोग उत्तम असून, शेतकऱ्यांना बळ देणारा आहे. परंतु, याविषयी राजकीय मंडळींनी काही बोलल्यास तुम्ही वाइनचा पुरस्कार करीत असल्याचे बोलले जाते. अशात वाइनचे नाव 'द्राक्षासव' केल्यास त्याविषयी आम्हाला मोकळेपणाने बोलता येईल, असेही दादा भुसे म्हणाले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news